मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील मतभेदांमुळे राजस्थानात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. दरम्यान उद्या सकाळी १०.३० वाजता अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. त्यावेळी नेमके चित्र स्पष्ट होऊ शकते.

काँग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु असून त्यांच्यासाठी संदेश सोडला आहे असे पांडे यांनी संगितले. पीटीआयशी ते बोलत होते.

राजस्थानमधल्या घडामोडींची काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना माहिती देण्यात आली आहे. चौकशीला सर्वांनी सहकार्य करावे, असे पांडे यांनी सांगितले. भाजपा राजस्थानातील काँग्रेस सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यात ते यशस्वी होणार नाही असे अविनाश पांडे म्हणाले.


‘आमच्यावर आरोप करु नका, आधी स्वत:चं घर संभाळा’
“काँग्रेसने भाजपावर आरोप करु नये, त्याऐवजी त्यांनी आपले घर संभाळावे” असे भाजपा नेते ओम माथुर यांनी म्हटले आहे. राज्यात सत्तेवर आल्यापासूनच अशोक गेहलोत सरकार अडचणीत आहे असे माथुर म्हणाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

“मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. हे सत्य स्वीकारण्याऐवाजी गेहलोत भाजपाला जबाबदार ठरवत आहेत” असे माथुर यांनी सांगितले.