पंधरा दिवसांपूर्वी भल्या सकाळी साखरझोपेत असलेल्या राजकोटच्या शांतनिवांत गल्ल्यांमधून जाताना तिथे सुरू असलेल्या निवडणुकांच्या हवेचा पहिल्यांचा अनुभव आला. मोठय़ा शहरांमधून कमी झालेले फलकयुद्ध तेथे अगदी जोरदारपणे सुरू होते. ‘हू छु विकास’, ‘हू छु गुजरात’च्या फलकावर नियमित पाणीपुरवठा सुरू झाल्याचा दावा होता तर ‘२२ वर्षांत फक्त १५ मिनिटेच पाणी पुरवण्याइतपत काम झाले’ असा टोला लगावणारा ‘हू नवसर्जन लावे छे’चा फलक शेजारीच होता. चालकाला विचारले तर म्हणाला, इस बार तो काँग्रेस की भी हवा है.. फिफ्टी फिफ्टी मामला है. गुजरातसह संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या सामन्याचा निकाल उद्या लागेल आणि जय-पराजयावरही शिक्कामोर्तब होईल. मात्र अगदी जवळून अनुभवलेला हा सामना रंगतदार झाला एवढे नक्कीच म्हणता येईल.

२०१२ मध्ये विधानसभा आणि २०१४ मधल्या लोकसभा निवडणुकांवेळी गुजराती मतदारांमध्ये द्विधा मन:स्थिती नव्हतीच.. लोकसभेवेळी तर किती मतांनी जिंकणार एवढाच प्रश्न होता. राहुल गांधी यांच्या मंदिरभेटी आणि प्रचारामुळे मरगळ झटकून जाग्या झालेल्या काँग्रेसचा परिणाम राजकोटमध्ये जाणवत होता. नंतर दिवसभरात राजकोटमधल्या शांत, सुशेगात असलेल्या परिसरात हिंडताना चहाविक्रेता, फरसाण दुकानदार, रिक्षाचालक, व्यावसायिक, हॉटेलमालक.. सर्वाच्याच बोलण्यात काँग्रेसचा उल्लेख होता. दोन दिवसांपूर्वी हार्दकिने घेतलेल्या सभेला लोटलेल्या गर्दीचेही वर्णन होते. म्हणजे भाजप हक्क सांगत असलेल्या घराचा दरवाजा काँग्रेस ठोठावत होती. अडीच वर्षांपूर्वी पाटीदार आंदोलनातून उदयाला आलेला हार्दकि पटेल आणि त्याचे तरुण साथीदार यांचा या काँग्रेस उदयात सिंहाचा वाटा आहे, हे उघडच होते. ज्या समाजमाध्यमावर भाजपची पकड, त्याच माध्यमाला हाताशी धरून त्यांनी ‘विकास गांडो थयो छे’ ही मोहीम राबवली आणि यशस्वी केली. हार्दिक पटेलने मागितलेले आरक्षण काँग्रेस देऊ शकणार नाही हे माहिती आहे. पण आम्ही २२ वर्षे सरकारच्या पाठीशी उभे आहोत आणि आता त्यांना आमच्या समाजाची ताकद दाखवून देण्याची वेळ आली आहे, असे हार्दकिच्या सभेला हजेरी लावणाऱ्या पाटीदार समाजाचे प्रातिनिधिक मत. शेतकरी, मच्छीमार, दलित, ओबीसी, आदिवासी यांच्यासह गुजरातमधील प्रबळ पाटीदार समाजाची मोट बांधलेल्या काँग्रेसने मुख्यमंत्री विजय रुपाणींचा सहजशक्य विजय अवघड करून टाकला. त्यात रुपाणींसह राजकोटमधील सर्व उमेदवारांसाठी मोदींनी घेतलेल्या सभेसाठी माणसे जमवण्याची वेळ आली. २२ वर्षे सत्तेत असलेल्या भाजपसाठी हे सर्व निश्चितच चिंता करायला लावणारे होते. पोरबंदरमध्येही अशीच स्थिती. तिथे शेती व मत्स्योद्योगमंत्री निवडणुकीसाठी पुन्हा उभे राहिले आणि त्यांच्याच मतदारसंघातील मच्छीमार संघटनेने त्यांच्याविरोधात भूमिका घेत राहुल गांधी यांच्या सभेला हजेरी लावली. मी भाजपचा कार्यकर्ता आहे. मात्र मच्छीमारांच्या समस्या सर्व व्यासपीठावर मांडणे हे माझे कर्तव्य आहे, अशी थेट भूमिका संघटनेचे प्रमुख भारत मोदी यांनी घेतली. सौराष्ट्रमधील मतदानाला अवघा आठवडा उरला असताना ही अशी स्थिती होती.

या सगळ्यात राहुल गांधींच्या मंदिरदर्शनाचीही चर्चा होती. मंदिराच्या हजारभर पायऱ्या चढून जाणारया राहुल गांधी यांच्याबद्दल कुतूहल व्यक्त होत होते. राहुल गांधी यांची प्रतिमा उंचावत असतानाच राजकोटमधील भाषणांमध्ये नरेंद्र मोदी यांचा एक संवाद चांगलाच लक्षात राहिला. गुजरातीमधून केलेल्या भाषणात मोदींनी विचारले, आज जगात भारताची वाहवा होते आहे की नाही? हो असा गर्दीने आवाज दिला. भारताचा जयजयकार होतो आहे की नाही? अमेरिकेत? इंग्लंडमध्ये? जपानमध्ये? सगळीकडे? अशा सर्व प्रश्नांवर होकारार्थी उत्तर घेतल्यानंतर त्यांचा पुढचा प्रश्न होता, याचे काय कारण आहे? श्रोत्यांमधून नरेंद्र मोदी अशा आरोळ्या सुरू झाल्या. हे उत्तर ऐकल्यावर नरेंद्र मोदी समाधानाच्या सुरात म्हणाले, मोदी नाही, १२५ कोटी भारतीयांमुळे हे असे घडतेय. माझ्याशी हे देश हस्तांदोलन करत असतात तेव्हा ते १२५ कोटी भारतीयांशी हस्तांदोलन करतात. हा संवाद नंतर मोदींच्या अनेक भाषणांत ऐकू आला.

याचदरम्यान अहमदाबादमधील राजीव गांधी भवन या काँग्रेसच्या कार्यालयात अनेक नेत्यांशी भेट झाली. तोपर्यंत पहिल्या टप्प्याचे मतदान पार पडले होते. किती जागा मिळतील वगैरे सुरुवातीचे प्रश्न झाल्यावर विषय कार्यकर्त्यांच्या पातळीवर आला. फक्त एका पानावरील ४० मतदारांची काळजी घेणाऱ्या भाजप पक्षप्रमुखांप्रमाणे काँग्रेसकडे कार्यकर्त्यांचे जाळे नाही व त्यामुळे मतदानात फटका बसणार याची काँग्रेस नेत्यांना कल्पना होती. मात्र राज्यात २२ वर्षे सत्तेत नसलेल्या पक्षाला कार्यकत्रे मिळवणे अवघड होऊन बसते. पूर्वी अहमदाबादच्याच काही मतदारसंघात मतदान केंद्रांवर बसण्यासाठीही कार्यकत्रे मिळत नसत. या वेळी कार्यकत्रे आहेत. जुने कार्यकत्रेही उत्साहाने कामाला लागले आहेत, याचेच समाधान काँग्रेसच्या गोटात होते.

या सामन्यात अनेकदा पारडे इकडून तिकडे झुकत होते. कधी राहुलच्या मंदिर भेटी, कधी विकास गांडो थयो छे, कधी हार्दकिच्या सीडी, कधी गब्बर सिंग टॅक्स, कधी मणिशंकर अय्यर यांचे विधान, कधी मोदींचा मनमोहन सिंग यांच्यावरील आरोप.. काँग्रेसमुळे मोदींना पूर्ण क्षमतेने प्रचारात उतरावे लागले. अटीतटीच्या सामन्यात अनुभवाच्या आधारे अंतिम क्षणी खेळ उंचावणारा अनुभवी खेळाडू सामना जिंकतो. या लढतीचा निकाल काय लागणार ते उद्या स्पष्ट होईलच. मात्र टक्कर कडवी होती, हे दोन्ही पक्षांच्या गोटात बोलले जाईल..

हवा सतत बदलणारी

ग्रामीण भागात काँग्रेसची हवा चांगलीच तापली होती. इकडे दक्षिण गुजरातमधील सूरतमध्येही हिरा आणि कपडा व्यापाऱ्यांनी नोटबंदी आणि त्यानंतरही जीएसटीला जोरदार विरोध केला होता. २८ दिवस बाजार बंद होता. इथल्या संघटनांचे काही प्रमुख काँग्रेसच्या मंडपात दिसत होते. बहुमजली घाऊक बाजारात फिरताना मात्र वेगळीच हवा जाणवू लागली. केवळ हवापालट म्हणून व्यापारी काँग्रेसची हवा अनुभवत असले तरी धंद्याच्या मंदीचा आणि मतदानाचा  काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगायला सुरुवात केली तेव्हा या सामन्याचा निकाल काँग्रेसला पाहिजे तसा लागणार नसल्याची कल्पना आली. पुढे अहमदाबाद, बडोदा या शहरांत तर िहदुत्वाचीच हवा होती. गोध्राकांड व दंगल यांचा अनुभव घेतलेल्या पिढीपर्यंत मोदींचा, आम्हीच तुम्हाला सुरक्षा पुरवू शकतो, हा संदेश व्यवस्थित पोहोचत होता. त्यामुळे काँग्रेसचा विरोध चवीने वाचण्याव्यतिरिक्त अहमदाबादमध्ये विशेष बदल जाणवत नव्हता. बदल होता तो मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये. या वेळी काँग्रेसनेही िहदुत्वाचा झेंडा हाती घेतल्याने त्यांच्याबद्दल कोणीही बोलत नव्हते. दलित, ओबीसी, पाटीदार अशा जातींचा वरचष्मा असलेल्या या निवडणुकीतून मुस्लीम बाजूला पडले होते.