लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये सर्व काही आलबेल नाही. अशोक गेहलोत यांनी मुलाच्या पराभवासाठी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना जबाबदार धरले आहे. वैभव गेहलोतच्या पराभवाची जबाबदारी सचिन पायलट यांनी स्वीकारावी असे अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

सचिन पायलट उपमुख्यमंत्री असण्याबरोबरच राजस्थान प्रदेश काँग्रेसचे प्रमुख आहेत. वैभव गेहलोत जोधपूरमधून निवडणूक लढवत होते. अशोक गेहलोत यांच्या विधानावर सचिन पायलट यांनी आश्चर्य व्यक्त केले असून यावर काहीही प्रतिक्रिया देण्यास त्यांनी नकार दिला. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

एका मुलाखतीत अशोक गेहलोत यांना जोधपूरच्या जागेसाठी वैभव यांच्या नावाची शिफारस सचिन पायलट यांनी केली होती हे खरे आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हे सचिन पायलट यांनी सांगितले तर बरे होईल असे उत्तर दिले. जोधपूर लोकसभा मतदारसंघात आपले सहा आमदार आहेत. त्यामुळे आपण तिथून मोठया मताधिक्याने विजय मिळवू असे पायलट साहेब म्हणाले होते. आमचा प्रचार सुद्धा चांगला झाला होता. त्यामुळे त्यांनी त्या जागेची जबाबदारी घ्यावी. जोधपूरची जागा आम्ही का जिंकलो नाही त्याचे सखोल विश्लेषण झाले पाहिजे असे गेहलोत म्हणाले.

जोधपूर मधल्या पराभवाची जबाबदारी पायलट यांची आहे असे तुम्हाला वाटते का ? या प्रश्नावर गेहलोत म्हणाले की, जोधपूरमधून आपण जिंकतोय असे त्यांचे म्हणणे होते. त्यासाठी त्यांनी वैभवला तिथून तिकिट दिले. आमचा सर्वच्या सर्व २५ जागांवर पराभव झाला. याबद्दल जर कोणी म्हणत असेल की, मुख्यमंत्री किंवा प्रदेशाध्यक्षांनी याची जबाबदारी घ्यावी तर माझ्या दृष्टीने ही सामूहिक जबाबदारी आहे.

राजस्थानात काँग्रेसची सत्ता असूनही लोकसभेच्या सर्वच्या सर्व २५ जागांवर काँग्रेसचा पराभव झाला. निवडणुकीच्या चार ते पाच महिने आधी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने भाजपाचा पराभव करुन सत्ता मिळवली होती.