एकवेळ होती जेव्हा राजकिय नेते भाषणांमधून एकमेकांवर टीका करायचे किंवा खिल्ली उडवायचे, पण आता सोशल मीडियाच्या जमान्यात राजकारणीही इंटरनेटवरच एकदुसऱ्याला टोला हाणताना दिसतात. काँग्रेसनेही पंतप्रधान मोदींच्या ‘अच्छे दिन’च्या घोषणेची अशाचप्रकारे खिल्ली उडवली आहे.

गेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये अच्छे दिन आणण्याची घोषणा करत भाजपा आणि मोदी सत्तेवर आले. तेव्हापासून अच्छे दिन केव्हा येणार या प्रश्नाने भाजपाच्या नाकीनऊ आणले आहेत. काँग्रेसने फ्रान्सच्या पॉल पोग्बा याचा फुटबॉल विश्वचषकातील अंतिम सामन्याचा व्हिडीओ ट्विट करुन अच्छे दिनवरुन भाजपाची टिंगल उडवली आहे. फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील अंतिम सामन्यानंतर फ्रान्सचा स्टार खेळाडू पोग्बा जल्लोष करताना इकडे तिकडे मान वळवत काहीतरी शोधण्याचे हावभाव देत होता. पोग्बा मैदानावर आणि प्रेक्षकांमध्ये प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी शोधत आहे, असं त्याच्या कृतीवरुन वाटत होतं. त्याच्या या विचित्र हावभावामुळे अनेकांचं लक्ष त्याने वेधून घेतलं होतं. पोग्बाचा हाच व्हिडीओ ट्विट करुन काँग्रेसने भाजपाला लक्ष्य केलं आहे. आम्ही आणि पोग्बा अच्छे दिन शोधतोय असं बोचरं ट्विट या व्हिडीओसोबत काँग्रेसकडून करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये काँग्रेसने खुद्द पोग्बालाही टॅग केलं आहे.

या व्हिडीओद्वारे पॉल पोग्बा प्रमाणेच देशाचा सामान्य व्यक्तीही मोदींनी आश्वासन दिलेले अच्छे दिन शोधण्यासाठी धडपडतोय, असं सांगण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला आहे. भाजपासाठी हा व्हिडीओ जरी झोंबणारा असला तरी नेटकऱ्यांकडून मात्र या व्हिडीओला चांगलाच प्रतिसाद मिळतोय.
पाहा व्हिडीओ –