News Flash

“तरुणांसमोर मोठं आयुष्य आहे, त्यांना आधी लस द्या”; मल्लिकार्जून खर्गेंची मागणी

"माझ्याकडे जगण्यासाठी १० ते १५ वर्षच आहेत"

संग्रहित (PTI)

देशात सोमवारी लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. या टप्प्यात ६० वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसंच ४५ वर्षे पूर्ण ते ६० वर्षांपर्यंत वय असणाऱ्या व सह-व्याधी (कोमॉर्बिड) असणाऱ्या व्यक्तींचेही लसीकरण केलं जात आहे. लसीकरणासाठी अनेक नेते पात्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, व्यंकय्या नायडू यांनी पहिल्या दिवशी लसीकरण करुन घेतलं. याशिवाय ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीदेखील करोना लस घेतली.

दरम्यान काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी करोना लसीसाठी तरुणांना प्राथमिकता दिली पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे. “माझं वय ७० पेक्षा जास्त आहे. तुम्ही तरुणांना करोना लस दिली पाहिजे आणि त्यांचं आयुष्य वाढवावं. माझ्याकडे जगण्यासाठी १० ते १५ वर्षच आहेत. पण तरुणांकडे मोठं आयुष्य आहे. मी देखील करोना लस घेणार आहे,” असं खर्गे एएनआयशी बोलताना म्हणाले आहेत.

देशात लस नोंदणी ‘पोर्टल’च्या माध्यमातून

पात्र असणाऱ्या सर्व खासदारांना ८ मार्चला अधिवेशन सुरु होण्याआधी लस दिली जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. ७७७ खासदारांपैकी ३६६ खासदारांच वय ६० हून अधिक असून लसीकरणास ते पात्र आहेत.

पहिल्या दिवशी ज्येष्ठांची परवड

पहिला टप्पा १६ जानेवारी रोजी सुरू झाला होता. पहिल्या टप्प्यात आघाडीवरील करोनायोद्धय़ांच्या लसीकरणासाठी सीरम संस्थेने उत्पादित केलेली ‘ऑक्सफर्ड’ची ‘कोव्हिशिल्ड’ आणि भारत बायोटेक कंपनीची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लशी वापरल्या गेल्या. पहिल्या टप्प्यात दोन्ही लशींच्या परिणामकारकतेबाबत शंका घेतल्या गेल्या होत्या. तिसरी चाचणी न झालेल्या देशी ‘कोव्हॅक्सिन’ लशीच्या वापरास परवानगी दिल्याबद्दल केंद्र सरकारवर टीकाही झाली होती. दिल्लीतील राममनोहर लोहिया रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी व्यवस्थापनाला पत्र लिहून आक्षेप नोंदवलं होतं.

देशात लस नोंदणी ‘पोर्टल’च्या माध्यमातून
पात्र व्यक्तींनी त्यांची नावनोंदणी को-विन २.० उपयोजनावर करायची नसून पोर्टलच्या माध्यमातून करायची आहे, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. को-विन अ‍ॅप हे प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते फक्त प्रशासकांसाठी आहे. लस घेण्यास पात्र व्यक्तींनी पोर्टलच्या माध्यमातून नावनोंदणी करायची आहे.

मंत्रालयाने ट्विट संदेशात म्हटलं आहे, की लसीकरण नोंदणी व वेळेची नोंदणी कोविन पोर्टल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू कोविन डॉट गव्ह डॉट इन’ येथे लसीकरणासाठी नोंदणी करायची आहे. प्लेस्टोअरवरील उपयोजन हे प्रशासकांसाठी आहे. सरकारने बुधवारी असे जाहीर केलं होतं, की तिसऱ्या टप्प्यात १ मार्चपासून साठीवरील व्यक्ती तसेच ४५ वर्षे व त्यावरील वयोगटातील सह आजाराच्या व्यक्तींना लस देण्यात येईल. त्यासाठी आता कोविन पोर्टल ‘डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट कोविन डॉट गव्ह’ उपलब्ध करण्यात आले आहे. आरोग्य सेतूच्या माध्यमातूनही लसीकरणासाठी नोंदणी करता येणार आहे. लाभार्थी थेट लसीकरण केंद्रात येऊन ओळख पटवून लस घेऊ शकतात. पात्र व्यक्ती त्यांच्या पसंतीचे ठिकाण व वेळ उपलब्धतेनुसार निवडू शकतात. साठ वर्षे वयावरील सर्व नागरिक लसीकरणास पात्र आहेत. या शिवाय वीस सहआजार असलेले ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तीही लसीकरणास पात्र आहेत. नागरिकांनी कोविन पोर्टलवर नोंदणी करायची असून ती मोबाईल क्रमांकाच्या मदतीने करता येईल. या वेळी वन टाइम पासवर्ड दिला जाईल. कोविनवर खाते सुरू करून मोबाइल क्रमांकाच्या मदतीने नोंदणी व वेळ घेता येणार आहे. लाभार्थीना आयडी कार्डचा प्रकार व क्रमांक दिला जाईल.

ही कागदपत्रे आवश्यक
ऑनलाइन नोंदणीसाठी आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, वाहन चालक परवाना, पॅनकार्ड, एनपीआर स्मार्ट कार्ड, पेन्शन कागदपत्रे (छायाचित्रासह) ग्राह्य़ धरली जातील. ४५ ते ५९ वयोगटातील व्यक्तींना सह आजाराचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 10:17 am

Web Title: congress mallikarjun kharge demands corona vaccination for youngsters sgy 87
टॅग : Coronavirus
Next Stories
1 १३ महिन्यांच्या तुरुंगावासादरम्यान त्या कैद्याने बनवलं सॉफ्टवेअर; सर्वोच्च न्यायालयानेही केलं कौतुक
2 धक्कादायक! मुलीची छेड काढणाऱ्यांची तक्रार केली म्हणून पित्याची गोळ्या झाडून निर्घृण हत्या
3 “पती कितीही क्रूर असला तरी त्या शरीरसंबंधांना…”; वैवाहिक बलात्कारांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Just Now!
X