सार्वत्रिक निवडणूक आणि विविध राज्यांतील निवडणुकीत सपाटून मार खावा लागल्याच्या पाश्र्वभूमीवर रविवारी काँग्रेसने आपला १३०वा स्थापना दिन साजरा केला.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या दिल्लीतील मुख्यालयात झालेल्या एका सोहळ्याला पक्षातील विविध मान्यवर नेते उपस्थित होते. या वेळी गांधी यांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकावण्यात आला. परंतु पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी या सोहळ्याला उपस्थित नव्हते.
जम्मू-काश्मीरमधील सरकार स्थापनेविषयी विचारले असता गांधी म्हणाल्या, की जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत आम्हाला निर्णायक बहुमत मिळालेले नाही. आमच्या पक्षाला तिथे फक्त १२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे तेथे इतर पक्ष मिळून सरकार स्थापन करतील.
काँग्रेस पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाला (पीडीपी) सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देणार आहे का, या प्रश्नावर मात्र सोनियांनी हसण्यावारी नेले आणि त्या पत्रकार कक्षातून निघून गेल्या. ‘पीडीपी’ हा जम्मू-काश्मीरमधील सर्वात जास्त जागा मिळवलेला पक्ष आहे. ‘पीडीपी’ला राज्यात २८ जागा मिळाल्या आहेत.
यावेळी पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या राज्यातील पराभवाबद्दल अधिक भाष्य करण्याचे टाळले. ते म्हणाले की, गतकाळात काँग्रेसच्या नेत्यांनी देशासाठी जे काही केले आहे, याची तुलना केल्यास एका निवडणुकीतील पक्षाचा विजय वा पराजय काहीच नाही. आम्ही आजवर अनेक चढउतार पाहिले आहेत.
स्थापना दिन सोहळ्याला माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, ज्येष्ठ नेते ए. के. अँटनी, अंबिका सोनी, मोतीलाल व्होरा आणि गुलाम नबी आझाद उपस्थित होते.
२८ डिसेंबर १८८५ रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. काँग्रेसचे पहिले अधिवेशन मुंबईत २८ आणि ३१ डिसेंबर रोजी भरले. याला पक्षाचे ७२ सदस्य उपस्थित होते.
गेल्या वर्षी काँग्रेसच्या स्थापना दिनाला दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी सोहळा झाला. काँग्रेसने १५ वर्षांनंतर दिल्लीतील आपली सत्ता गमावली. २००९ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत २०६ जागा मिळवणाऱ्या काँग्रेसचे एप्रिल २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत पानिपत झाले. त्यांना फक्त ४४ जागांवर विजय मिळवता आला. याशिवाय महाराष्ट्र, हरयाणातही सत्ता गमवावी लागली.