परराष्ट्र व्यवहार, गृह आणि वित्त यांसारख्या महत्त्वाच्या खात्यांसाठी गठित करण्यात आलेल्या संसदीय समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडे देण्यात आले आहे. वीरप्पा मोईली, शशी थरूर आणि पी. भट्टाचार्य आदी ज्येष्ठ  काँग्रेस नेत्यांची अध्यक्षपदी वर्णी लागली असून, एकूण पाच संसदीय समित्यांचे अध्यक्षपद काँग्रेस पक्षाकडे सोपविण्यात आले आहे.
विरोधी पक्षनेतेपदही गमविण्याची नामुष्की काँग्रेस पक्षावर ओढवली आहे. मात्र अत्यंत प्रतिष्ठेच्या लोक लेखा समितीचे अध्यक्षपद ज्येष्ठ काँग्रेस नेते के. व्ही. थॉमस यांच्याकडे सोपविण्यात आले, तर वित्तविषयक संसदीय समितीचे अध्यक्षपद वीरप्पा मोईली यांच्याकडे, परराष्ट्र  व्यवहारविषयक समितीचे अध्यक्षपद शशी थरूर यांच्याकडे सोपविण्यात आले. गृहमंत्रालयातील बाबींशी निगडित समितीचे अध्यक्षपद पी. भट्टाचार्य यांना देण्यात आले.  गतवेळी मनुष्यबळ विकास आणि क्रीडाविषयक समित्यांमध्ये असलेल्या सोनिया गांधी यांना यंदा कोणत्याही समितीत स्थान मिळालेले नाही. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मात्र परराष्ट्र व्यवहारविषयक समितीचे सदस्यत्व देण्यात आले आहे.