अभिनयाकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि दशकभराची राजकीय कारकिर्द असलेल्या खुशबू सुंदर यांनी काल काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन भाजपात प्रवेश केला. द्रमुकमधून काँग्रेसमध्ये आलेल्या खुशबू यांनी लगेचेच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केल्याने सध्या राजकीय वर्तुळामध्ये या पक्षप्रवेशाची चांगलीच चर्चा आहे. मात्र काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेस केल्यानंतर त्यांनी काँग्रेसला मानसिक संतुलन बिघडलेला पक्ष असं म्हटलं आहे. तामिळनाडू काँग्रेस समितीचे अध्यक्ष के. एस. अलगिरि यांनी खुशबू यांच्या जाण्याने पक्षाला विशेष फरक पडणार नाही अशी प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यावरच मत व्यक्त करताना खुशबू यांनी ही टीका केली आहे.

खुशबू यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर अलगिरि यांनी खुशबू यांच्या जाण्याने काही फरक पडणार नाही असं म्हटलं होतं. तसेच अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या खुशबू या पक्षाच्या नियमांनुसार काम करत नव्हत्या असा टोलाही अलगिरि यांनी इंडिया टुडेशी बोलताना लगावला होता. “त्यांनी पक्ष सोडल्याने काही होणार नाही. भाजपामध्ये त्यांना कोणी बोलावलंही नव्हतं. त्या त्यांच्या इच्छेने भाजपामध्ये गेल्यात. तशाही त्या पक्षात असताना पक्षाच्या नियमांनुसार काम करत नव्हत्या,” असं अलगिरी या मुलाखतीमध्ये म्हणाले होते.

चेन्नईमध्ये खुशबू यांचे भाजपाने एका छोट्या कार्यक्रमाचे आयोजन करत पक्षात स्वागत केलं. त्यानंतर बोलताना खुशबू यांनी, “मी काँग्रेसमध्ये मागील सहा वर्षांपासून होतो. मी पक्षासाठी खूप कष्ट घेतले आहेत. मी पक्ष सोडल्यानंतर मला तो मानसिक संतुलन बिघडलेल्यांचा पक्ष होता असं मला जाणवलं,” असं म्हटलं आहे.

मात्र खुशबू यांनी केलेल्या या तुलनेवरुन दिव्यांगांसाठी काम करणाऱ्यांनी आक्षेप नोंदवला आहे. दिव्यांगासाठी काम करणाऱ्या दिपकनाथन यांनी काँग्रेसवर टीका करताना खुशबू यांनी दिव्यांगांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. “काँग्रेसवर टीका करताना दिव्यांगांशी तुलना करणे चुकीचे आहे. तुम्ही त्यांची तुलना का करता? ते ही तुमच्यासारखेच नाहीत का?,” असा सवाल दिपकनाथन यांनी उपस्थित केल्याचे इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.