शिमला : सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत (सीएए) काँग्रेस पक्ष अफवा पसरवून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे शुक्रवारी केला. तसेच देशातील कुठल्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेतले जाणार नसल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या सरकारच्या द्विवार्षिक पूर्तीनिमित्त प्रसिद्ध अशा रिज मैदान येथे एका रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या रॅलीला संबोधताना अमित शहा यांनी हा आरोप केला. सीएएमुळे मुस्लीम त्यांचे नागरिकत्व गमावून बसतील अशी अफवा काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांनी फसरवली आहे, असे सांगत शहा यांनी यावेळी काँग्रेस पक्ष आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, भाजपचे सरकार येण्यापूर्वी ‘आलिया-मालिया-जमालिया’ हे पाकिस्तानातून भारतात येऊन आपल्या जवानांना शहीद करत होते आणि तत्कालिन पंतप्रधान शांतच होते. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविषयी काँग्रेस सरकारची अतिशय मुळमुळीत भूमिका होती.’

सीएए विरोधात नवी दिल्लीत सुरू असलेल्या निदर्शनाविषयी शहा म्हणाले की, ‘राहुल बाबा’ यांना मी आव्हान देतो की, त्यांनी अधिनियमामध्ये लिहिलेली एक ओळ तरी दाखवावी ज्यामध्ये कोणत्याही नागरिकाचे नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद आहे. या कायद्यानुसार कोणत्याही अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित कोणाचेही नागरिकत्व हिरावून घेण्याची तरतूद नाही, तर बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातून आलेल्या अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्याची तरतूद आहे.’