भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचा आरोप, सोनियांना पत्र

करोनाविरुद्धच्या लढ्याबाबत काँग्रेस पक्ष जनतेची दिशाभूल करीत असून देशात अकारण भीतीचे वातावरण निर्माण करीत असल्याचा आरोप मंगळवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांचे वर्तन दुटप्पीपणाचे आणि खुजेपणाचे असल्याचे जनतेच्या स्मरणात राहील, असेही नड्डा यांनी म्हटले आहे.

देशातील करोनाची स्थिती हाताळण्यावरून काँग्रेस कार्यकारिणी समितीने अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर नड्डा यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना चार पानी पत्र लिहिले आहे. या आव्हानात्मक काळात काँग्रेस पक्ष आणि त्या पक्षाच्या नेत्यांच्या वर्तनाने आपल्याला वेदना झाल्या आहेत, पण आश्चर्य वाटलेले नाही, असेही नड्डा यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली करोनाविरुद्धचा लढा विज्ञान आणि करोनायोद्ध्यांवरील दृढ विश्वासावर सुरू आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंतप्रधानांनी वैयक्तिक कार्यक्रम राबविण्याऐवजी आपल्या चुकांचे प्रायश्चित्त घ्यावे आणि नागरिकांच्या वेदनांची जाणीव ठेवून त्यांची सेवा करावी, असा ठराव काँग्रेस कार्यकारिणीच्या बैैठकीत करण्यात आला होता. देशात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना भाजप एप्रिल महिन्यात निवडणूक मेळावे आयोजित करीत होता, अशी टीका करण्यात आली, त्यावरूनही नड्डा यांनी हल्ला चढविला. काँग्रेसने केरळमध्ये मोठ्या निवडणूक सभा आयोजित केल्या आणि त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढला आणि आता काँग्रेस इतरत्र आयोजित करण्यात आलेल्या सभांकडे अंगुलिनिर्देश करीत आहे, असेही नड्डा म्हणाले.

मोदीजी, डोळ्यावरील गुलाबी चष्मा काढा : राहुल यांची पंतप्रधानांवर टीका

नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी देशातील करोनास्थितीवरून मंगळवारी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी आपल्या डोळ्यावरील गुलाबी चष्मा काढून टाकावा, कारण त्यामधून त्यांना केवळ सेंट्रल विस्ता प्रकल्पच दिसतो, अन्य काहीच दिसत नाही, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

संसदेची नवी इमारत आणि पंतप्रधानांचे नवे निवासस्थान यांचा समावेश असलेला सेंट्रल विस्त प्रकल्प रद्द करावा आणि त्या पैशांचा वापर देशातील वैद्यकीय आणि पायाभूत सुविधा वाढविण्यासाठी करावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

नद्यांमध्ये असंख्य मृतदेह तरंगत आहेत, रुग्णालयांमध्ये लांबलचक रांगा लागलेल्या आहेत, जनतेचा जगण्याचा अधिकार हिरावून घेतला जात आहे. मोदी, आता डोळ्यावरील गुलाबी चष्मा काढा, त्यामधून आपल्याला केवळ सेंट्रल विस्ता प्रकल्पच दिसतो, अन्य काही नाही, असे राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे.