भोपाळ: मध्य प्रदेशात काँग्रेसच्या आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेस आमदार राहुल लोधी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन रविवारी भाजपमध्ये प्रवेश केला. मार्चपासून आतापर्यंत राज्यातील काँग्रेसच्या २६ आमदारांनी पक्ष सोडला आहे.लोधी यांचा राजीनामा स्वीकारण्यात आल्याची माहिती हंगामी अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांनी दिली आहे.

लोधी हे दामोह मतदारसंघातून निवडून आले होते. मध्य प्रदेशात तीन नोव्हेंबरला २८ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. त्यातील २५ जागा काँग्रेस आमदारांनी राजीनामा दिल्याने रिक्त आहेत. या आमदारांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशातील काँग्रेसचे कमलनाथ सरकार कोसळले होते.

राजीनामा दिलेले आमदार हे जोतिरादित्य शिंदे यांचे समर्थक मानले जातात. तर तीन जागा या भाजप आमदारांच्या निधनाने रिक्त आहेत. २३० सदस्य असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत बहुमतासाठी ११६ जागांची गरज आहे. सध्या भाजपकडे १०७ सदस्य आहेत, तर काँग्रेसचे ८७ सदस्य आहेत.