पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ६९ वा वाढदिवस आज साजरा केला जात आहे. देशभरातील त्यांच्या चाहत्यांकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. भाजपाकडून तर विशेष सप्ताह पाळला जात आहे. मात्र विशेष बाब म्हणजे पंतप्रधान मोदींच्या कामकाजावर टीका करणाऱ्या यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या रायबरेली मतदार संघातील काँग्रेस आमदाराने देखील मोदींच्या जन्मदिवसानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

रायबरेली मतरदार संघातील हरचंदपुरचे आमदार राकेश सिंह यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष सूर्य यज्ञाचे आयोजन केल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. एवढेच नाहीतर आमदार राकेश सिंह यांनी या यज्ञाबरोबरच मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्टरही लावले आहे. हे पोस्टर देखील चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार राकेश सिंह यांच्याबरोबर त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांनी देखील या यज्ञात सहभाग नोंदवला आहे.

शहराच्या मध्यवस्तीतील जगमोहनेश्वर मंदिरात हा विशेष यज्ञ केला गेला आहे. याबाबत माहिती मिळाताच काँग्रेसकडून या आमदारावर कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शिवाय त्यांची पक्षातून हाकलपट्टी देखील करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मात्र याबाबत अधिकृतपणे माहिती मिळालेली नाही.राकेश सिंह हे २०१७ मधील विधानसभा निवडणुकीत काँग्रसच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत.

मोदींच्या दीर्घ आयुष्यासाठी केली प्रार्थना
विशेष सूर्य यज्ञाचे आयोजन करणाऱ्या आमदार राकेश सिंह यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी देशासाठी चांगले काम करत आहेत. ज्याप्रमाणे सूर्य संपूर्ण विश्वाला प्रकाश देतो त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदी संपूर्ण देशाला प्रकाशमान करत आहेत. काँग्रेसकडून करण्यात आलेल्या कारवाईबाबत ते म्हणाले की, चांगले काम करणाऱ्या माणसाची स्तुती करायला हवी, मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तसेच, मोदी आणि योगी हे दोघेही महापुरुष असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.