मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती असावं यासंबंधी मोदी सरकार लवकरच निर्णय घेणार आहे. संबंधित समितीने अहवाल दिल्यानंतर लगेचच यासंबंधी निर्णय घेण्यात येईल असं नरेंद्र मोदी यांनी सांगितलेलं आहे. यादरम्यान माजी मंत्री आणि काँग्रेस नेते सज्जन सिंह वर्मा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे. मुलगी जर वयाच्या १५ व्या वर्षीही प्रजननक्षम असते तर लग्नाचं वय वाढवण्याची गरज काय अशी अजब विचारणा त्यांनी केली आहे.

“१५ वर्षांची मुलगीदेखील प्रजननक्षम असते असं डॉक्टर सांगतात. तर मग मुलींच्या लग्नाचं वय २१ करण्याची काय गरज आहे. शिवराज सिंग मोठे डॉक्टर झाले आहेत का?”, असं सज्जन सिंह यांनी म्हटलं आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं.

मुलींच्या लग्नाचं योग्य वय किती? सरकार लवकरच निर्णय घेणार; मोदींचं आश्वासन

सोमवारी पार पडलेल्या ‘नारी सन्मान’ कार्यक्रमात बोलताना शिवराज सिंग चौहान यांनी मुलींच्या लग्नाचं वय १८ ऐवजी २१ केलं पाहिजे असं म्हटलं होतं. सज्जन सिंह यांनी भाजपा सरकार मुलींची सुरक्षा करण्यात असमर्थ असल्याचा आऱोप केला आहे.

“अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या बलात्काराच्या प्रकरणांमध्ये मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. अशा प्रकरणांमध्ये कडक कारवाई करण्याऐवजी मुख्यमंत्री ढोंगीपणाचं राजकारण करत आहेत,” असं सज्जन सिंह यांनी म्हटलं असल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे.

भाजपाने सज्जन सिंह यांच्या वक्तव्यावर टीका केली असून हा देशातील मुलींचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. “आपल्या पक्षाच्या प्रमुख एक महिला आहेत हे ते विसरलेत का? प्रियंका गांधीदेखील एक महिला आहेत. माझी सोनिया गांधींना विनंती आहे की त्यांनी सज्जन सिंह यांना जाहीर माफी मागण्यास सांगावी आणि पक्षातून हाकलून द्यावं,” अशी मागणी भाजपा नेत्या नेहा बग्गा यांनी केली आहे.

दुसरीकडे काँग्रेसने सज्जन सिंह यांचा बचाव करताना ते फक्त डॉक्टरांची बाजू सांगत होते असं म्हटलं आहे. भाजपा विनाकारण मुद्दा तापवत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.