कर्नाटकमधील नवनिर्वाचित आमदार सिद्धू न्यामगौडा यांचा रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, आमदार सिद्धू हे गोव्यातून कर्नाटककडे कारने जात होते. त्याचदरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला. ६९ वर्षीय सिद्धू हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जमखंडी मतदारसंघातून भाजपा उमदेवाराचा पराभव करत पुन्हा एकदा विधानसभेत प्रवेश केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार सिद्धू हे बागलकोट येथील आपल्या घरी निघाले होते. तुलसीगिरीजवळ आल्यानंतर त्यांच्या इनोव्हा कारचे (केए ४८ एम ५०१५) टायर फुटले आणि कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या कठड्याला धडकली. त्यात सिद्धू यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचे इतर तीन सहकारी जखमी झाले आहेत. नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सिद्धू हे भाजपा उमेदवार श्रीकांत सुब्बाराव कुलकर्णी यांचा अडीच हजार मतांनी पराभव करत पुन्हा एकदा आमदार झाले होते.

दरम्यान, सिद्धू यांच्या मृत्यूमुळे काँग्रेस आमदारांची संख्या आता ७७ इतकी झाली आहे. यापूर्वी कर्नाटकच्या २२४ जागांपैकी २२२ ठिकाणी निवडणूक झाली होती. कुमारस्वामी यांचा राजीनामा आणि सिद्धू यांच्या अपघाती मृत्यूमुळे कर्नाटकात आता एकूण चार जागा कमी झाल्या आहेत.

कर्नाटकमध्ये काँग्रेस ७८ (आता ७७) जेडीएसला ३७ आणि बीएसपीच्या एक आमदाराच्या जोरावर कुमारस्वामी हे मुख्यमंत्री झाले आणि १०४ आमदार असलेला भाजपा विरोधी बाकावर बसला. आगामी पोटनिवडणुकीत हे समीकरण बदलूही शकते.