बंगळुरुत एका फेसबुक पोस्टवरुन झालेल्या हिंसाचारात तिघांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये १२ हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. संतप्त जमावाने दोन पोलीस ठाण्यांसोबत काँग्रेस आमदार श्रीनिवास मूर्ती यांच्या घरावरही हल्ला केला होता. श्रीनिवास मूर्ती यांच्या घराचं प्रचंड नुकसान झालं असून माझं घर का पेटवलंत ? असा सवाल त्यांनी एनडीटीव्हीशी बोलताना विचारला आहे. आपलं घर पेटवण्यात आल्याने प्रचंड दुख: झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“माझ्या घरावर का हल्ला केला ? मी काय केलं होतं ? जर मी काही चूक केली असेल तर तुम्ही पोलीस किंवा प्रसारमाध्यमांकडे जाऊ शकता. मी काहीच केलं नसताना करण्यात आलेला हा हल्ला दुर्दैवी आहे,” अशी भावना श्रीनिवास मूर्ती यांनी व्यक्त केली आहे. श्रीनिवास मूर्ती यांच्या भाच्याने धार्मिक तेढ निर्माण करणारी एक फेसबुक पोस्ट केली होती. यानंतर मोठ्या प्रमाणात हिंसाचार करण्यात आला.

आणखी वाचा- ‘मागच्या २५ वर्षात असं घडलं नव्हतं’, बंगळुरु हिंसाचारावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

श्रीनिवास मूर्ती यांनी हिंसाचाराचा निषेध केला आहे. ही योग्य प्रतिक्रिया नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. “माझा भाचा, बहिणीचा मुलगा..कोणीही असो. चूक झाली असेल तर पोलीस त्याची शिक्षा देतील. माझ्या घराला शिक्षा कशासाठी? मी काय चूक केली होती ? हे खूप वाईट आहे. माझ्या घराची पुढची बाजू पूर्णपणे जळाली आहे. काहीच राहिलेलंल नाही, सगळं जळून खाक झालं आहे,” असं श्रीनिवास मूर्ती यांनी सांगितलं आहे.

हल्ला झाला तेव्हा आपलं कुटुंब घरात नव्हतं अशी माहिती श्रीनिवास मूर्ती यांनी दिली आहे. “माझं कुटुंब सुरक्षित आहे. पाच मिनिटं आधीच कृष्ण जन्माष्टमी साजरी करण्यासाठी मंदिरात गेले होते. याचवेळी जमावाने घऱावर हल्ला केला,” असं श्रीनिवास मूर्ती यांनी सांगितलं आहे.

आणखी वाचा- “संपूर्ण देश अडाणी लोकांनी भरलाय का?”; बंगळुरुमधील घटनेवर अभिनेता संतापला

“या मतदारसंघात मला एक लाख मतं मिळाली आहे. मी जनतेचा सेवक आहे. आपण सर्व बहिण-भाऊ आहोत,” असंही ते म्हणाले आहेत. श्रीनिवास मूर्ती यांनी हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप केला आहे. पोलीस आरोपींचा शोध घेऊन शिक्षा देतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.