पंजाब विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. विरोधक आणि सत्ताधारी सभागृहाचे कामकाज सुरू असतानाच एकमेकांना भिडले. काँग्रेस आमदार तरलोचन सिंग यांनी चक्क सत्ताधारी बाकांच्या दिशेने चप्पल फेकली. ही चप्पल पंजाबचे महसूल मंत्री विक्रम सिंग मजिठिया यांच्या पोटावर जाऊन पडली. या प्रकारावेळी विरोधी बाकांवरील आमदार अध्यक्षांच्या दिशेने कॅगच्या अहवालाचे कागद फेकत होते. त्यामुळे गोंधळात अजूनच भर पडली. याच गोंधळात सत्ताधारी पक्षाकडून एकूण १२ विधेयके मंजूर करून घेण्यात आली.
विधानसभेच्या अध्यक्षांकडून सापत्न वागणूक मिळत असल्यामुळे काँग्रेसचे सदस्य संतप्त झाले होते, असे पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. त्यामुळे काँग्रेस सदस्यांकडून कॅगच्या अहवालाचे कागद आणि पुस्तिका अध्यक्षांच्या दिशेने फेकण्यात आल्या. या घटनेनंतर सभागृहात अतिरिक्त सुरक्षा तैनात करण्यात आली. संतप्त झालेले सदस्य सभागृहांच्या अध्यक्षस्थानापर्यंत पोहोचणार नाहीत, यासाठी त्यांच्या भोवती सुरक्षारक्षकांचे कडेच तयार करण्यात आले होते.
सभागृहात गोंधळाचे वातावरण असल्यामुळे अध्यक्षांनी प्रश्नोत्तराचा तास आणि शून्य काळ तहकूब केला होता. विरोधी बाकांवरील सदस्यांनी आपल्या जागेवर बसून त्यांचे म्हणणे मांडावे, अशी त्यांनी मागणी होती. पण विरोधक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली. कोणीच ऐकण्याच्या तयारीत नसल्याचे लक्षात आल्यावर अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब केले.