पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी केलेल्या सी-प्लेन प्रवासावरुन काँग्रेसने त्यांची खिल्ली उडवली आहे. या प्रवासाला ‘हवा हवाई’ संबोधत भाजपला विकास कळलाच नसल्याचा टोला काँग्रेसने लगावला आहे.


काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला यांनी मोदींवर ही टीका केली. ते म्हणाले, भाजपला अद्याप विकास कळलेलाच नाही. त्यांच्यासाठी हवा हवाई हाच विकास आहे. मिस्टर इंडिया या हिंदी चित्रपटामधील प्रसिद्ध गाणे हवा हवाई याचा उल्लेख करत भाजपला कशाचेच गांभीर्य नसल्याचे काँग्रेसने म्हटले.

दरम्यान, मोदींनी प्रचारादरम्यान भाजपने गुजरातमध्ये केलेल्या विकासकामांचा पाढा वाचला. १९९५ पासून गुजरातमध्ये सत्तेत आलेल्या भाजपने हवाई, रस्ते आणि रेल्वेच्या माध्यमांतून जनतेला अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. हे सर्व आम्ही १२५ कोटी भारतीयांसाठी केले आहे.


दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे प्रमुख ओमर अब्दुल्ला यांनी सोशल मीडियावर मोदी सी-प्लेनच्या जेट्टीवर उभे असल्याचा फोटो शेअर केला. मोदींच्या या प्रकारामुळे त्यांचे झेड प्लस सुरक्षा रक्षक निवांत कसे असू शकतील याबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.

पंतप्रधानपदाच्या खालच्या स्तरावरील कोणत्याही झेड प्लस सुरक्षा असलेल्या व्यक्तीला सिंगल इंजिन विमानात बसण्याची परवानगी देण्यात येत नाही. मात्र, तरीही पंतप्रधानांनी याचा आग्रह धरल्याबद्दल सुरजेवाला यांनी प्रश्न उपस्थित केला.