07 July 2020

News Flash

मोदींविरोधात संसदेत हक्कभंगाची नोटीस

लोकसभेत काँग्रेसचे वीरप्पा मोइली यांनी मोदी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली.

काँग्रेस सदस्यांनी राज्यसभेत मंगळवारीही भाजपविरोधी घोषणाबाजी केली. 

काँग्रेस सदस्यांची संसदेत जोरदार निदर्शने; जेटली यांच्याकडून पंतप्रधानांची पाठराखण

ऑगस्टा वेस्टलॅण्ड हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल काँग्रेसने मंगळवारी मोदींवर जोरदार हल्ला चढविला आणि संसदेच्या दोन्ही सभागृहात पंतप्रधानांविरुद्ध हक्कभंगाची नोटीस दिली. पक्षाच्या सदस्यांनी मंगळवारीही संसदेत जोरदार निदर्शने केली.

तथापि, सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होते, सभागृहाबाहेर आणि सभागृहात भ्रष्टाचारावर बोलण्याचा मोदींना अधिकार आहे, त्यांचे तोंड कोणीही बंद करू शकणार नाही, असे मत राज्यसभेत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेलिकॉप्टर खरेदीप्रकरणी सोनियांबाबत निवडणूक जाहीर सभेत जे वक्तव्य केले त्याविरुद्ध मोदी आणि पर्रिकर यांच्याविरोधात आपण हक्कभंगाची नोटीस दिल्याचे शांताराम नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले.

हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात यूपीएच्या नेत्यांनी लाच घेतल्याचे धादांत असत्य सभागृहाबाहेर सांगितले जात आहे, असे नाईक म्हणाले.

एका राजकीय नेत्याने सभागृहाबाहेर अन्य राजकीय नेत्याबद्दल केलेले भाष्य हक्कभंग कसा होऊ शकतो, असा सवाल जेटली यांनी केला. एका राजकीय नेत्याने अन्य राजकीय नेत्याबद्दल सभागृहाबाहेर वक्तव्य करणे ही प्रसिद्धीची बाब असून सोमवारी दिवसभर काँग्रेसचे सदस्य मीडियासमोर तेच करीत होते, असे जेटली म्हणाले.

राज्यसभेचे उपसभापती पी. जे. कुरियन म्हणाले की, नाईक यांनी नोटीस दिली होती त्यामुळे शून्य प्रहरात त्यांना म्हणणे मांडण्याची अनुमती देण्यात आली, हक्कभंगासारखा अन्य कोणताही प्रश्न मांडण्याची अनुमती देण्यात आली नव्हती. सभागृहात आणि सभागृहाबाहेर करण्यात आलेले वक्तव्य देशाच्या पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य आहे त्यामुळे त्याबाबत भेदाभेद करता येणार नाही, असे काँग्रेसचे आनंद शर्मा म्हणाले.

आरोपांचे राजकारण थांबवा!

लोकसभेत काँग्रेसचे वीरप्पा मोइली यांनी मोदी यांच्याविरोधात हक्कभंगाची नोटीस दिली. या नोटिशीबाबत आपण विचार करीत आहोत आणि निर्णय झाल्यानंतर मोइली यांना बोलण्याची संधी देण्यात येईल, असे अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सांगितले. तेव्हा मोइली यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, मात्र महाजन यांनी त्याला नकार दिला. काँग्रेसच्या सदस्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी सभागृहातील मोकळ्या जागेत धाव घेत घोषणाबाजी सुरू केली, आरोपांचे राजकारण थांबवा, लोकशाहीची हत्या थांबवा, अशा घोषणा या वेळी देण्यात आल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 11, 2016 2:29 am

Web Title: congress moves motions against modi
टॅग Congress
Next Stories
1 उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे बहुमत?
2 नरेंद्र मोदी यांची पदवी वैध दिल्ली विद्यापीठाचा स्पष्ट निर्वाळा
3 गॅस प्रकल्पांतील अनियमितता; राज्यसभेत विरोधकांचा गदारोळ
Just Now!
X