सुशांतच्या मृत्यूचा भाजपाकडून राजकीय ट्रम्प कार्डसारखा वापर केला जातो आहे असा आरोप काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे. एवढंच नाही तर बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे राजकारण केलं जातं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. रिया चक्रवर्तीला जी अटक करण्यात आली आहे त्यामध्ये तिच्यावर वेगळा गुन्हा आहे. तिला कोणत्याही पुराव्यांशिवाय अटक करण्यात आली आहे. बिहारच्या जनतेला फक्त भाजपा न्याय देऊ शकते असं चित्र रंगवण्याचा प्रयत्न या सगळ्या प्रकारातून होतो आहे असंही अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं आहे.

सुशांत सिंग राजपूतने १४ जून रोजी त्याच्या मुंबई येथील राहत्या घरी आत्महत्या केली. त्यानंतर संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं. मात्र या आत्महत्येनंतर काही दिवसातच सुशांत सिंह राजपूत हा बॉलिवूडच्या कंपूशाहीचा बळी असल्याची टीका करण्यात आली. या संदर्भातल्या बातम्या समोर आल्यानंतर यासंदर्भात पोलीस चौकशीही करु लागले. मात्र मुंबई पोलिसांवर तक्रार वेळेत न घेतल्याचा आरोप झाला. तसंच हे सगळं प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यात आलं. यानंतर अभिनेत्री कंगना रणौत हिनेही काही आरोप केले होते. दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते आहे असं वक्तव्य कंगनाने केलं. ज्यानंतर तिच्याविरोधात संतापाची लाट उसळली. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात ट्विटर वॉरही रंगलं होतं.

दरम्यान याआधीही बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलं जातं आहे असा आरोप झाला होता. आता काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी सुशांतच्या मृत्यूचं राजकारण केलं जातं आहे. बिहार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सगळं भाजपाकडून केलं जातं आहे असं म्हटलं आहे.