भाजपाच्या DNA मध्ये खोट आहे ही बाब आपल्याला जनतेपर्यंत पोहचवायची आहे. काँग्रेसचा डिएनए काय आहे? काँग्रेकडे नीती आहे, संविधान आहे. मात्र भाजपाचे लोक यावर प्रश्न उपस्थित करू शकतात, भाषण देऊ शकतात. मात्र तुम्ही डगमगून जायचे नाही असे काँग्रेसचे खासदार कमलनाध यांनी म्हटले आहे. भोपाळमध्ये ते बोलत होते. मध्य प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले आहे. मध्यप्रदेशातील देवास या ठिकाणचे भाजपा खासदार मनोहर उँटवाल यांनी कमलनाथ यांच्यावर टीका करत ते कमलनाथ अनाथ आहेत त्यांचा कोणीही नाथ नाही असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याला कमलनाथ यांनी उत्तर दिले आहे.

मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वातावरण चांगलेच तापलेले आहे. त्यामुळे आरोपांच्या प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. काँग्रेस खासदार कमलनाथ यांना शिवराजसिंह चौहान यांच्याबाबत विचारले असता लायक आणि नालायक माणसेही माझे मित्र आहेत असा खोचक टोला त्यांनी लगावला होता. अशात आता पुन्हा एकदा त्यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे. दरम्यान एकमेकांचे कट्टर शत्रू असलेले कमलनाथ आणि शिवराजसिंह चौहान हे भोपाळ येथील ईदगाह मैदानावर ईद निमित्त झालेल्या कार्यक्रमात एकत्र दिसले. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोघेही एकमेकांशी चांगला संवाद साधताना दिसले. असे असले तरीही कमलनाथ यांनी भाजपावर निशाणा साधत त्यांच्या डिएनएमध्ये खोट आहे हे दाखवून द्या असे आवाहन काँग्रेस कार्यकर्त्यांना केले आहे. आता यावर भाजपाकडूनही उत्तर दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.