काँग्रेस खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. रणवीत सिंह बिट्टू यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसंच त्यांची पगडीही खेचण्यात आली. आपल्यावरील हा हल्ला प्राणघातक असल्याचं रणवीत सिंह यांनी म्हटलं आहे. रणवीत सिंह जनसांसद कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी गेले असता हा प्रकार घडला. यावेळी त्यांच्यासोबत अमृतसरचे खासदार गुरजीत सिंह आणि आमदार कुलबीर सिंह उपस्थित होते. रणवीत सिंह यांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली आहे.

रणवीत सिंह यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपल्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती दिली आहे. “काही असामाजिक तत्वं ज्यांचा हेतू अस्पष्ट आहे त्यांनी आम्हा तिघांवर प्राणघातक हल्ला करुन परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला,” असं रणवीत सिंह यांनी म्हटलं आहे.

शेतकरी मोर्चात गोंधळ घालण्यासाठी ३०० पाकिस्तानी ट्विटर हॅण्डल्स; पोलिसांचा दावा

पंजाबच्या माजी मुख्यमंत्र्यांचे नातू असणारे रणवीत सिंह, गुरजीत सिंह आणि कुलबीर सिंह गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत जंतर मंतरवर नव्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करत आहेत. रणवीत सिंह यांनी केलेल्या दाव्यानुसार, काही लोकांनी त्यांना मारहाण केली तसंच पगडी खेचली. हा प्राणघातक हल्ला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रणवीत सिंह यांना संतप्त आंदोलकांनी धक्काबुक्कीदेखील केली. या झटापटीत कुलबीर सिंह यांचीही पगडीदेखील निघाली. काही लोकांनी रणवीत सिंह यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या वाहनांपर्यंत सुरक्षितपणे नेलं. रणवीत सिंह गाडीत बसल्यानंतरही काहीजणांनी काठ्यांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. दरम्यान रणवीत सिंह यांच्यावरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

दरम्यान रणवीत सिंह यांनी फेसबुक पोस्टमध्ये आपण सध्या ठीक असल्याचं सांगितलं आहे. या हल्ल्यामागे शेतकरी असण्याचा प्रश्नच नाही, कोणीतरी जाणुबुजून हा हल्ला केल्याचा आरोप नेत्यांकडून करण्यात आला आहे.