ठाम वक्तव्य आणि सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असणाऱ्या काँग्रेस नेते शशी थरुर यांनी नुकताच एक ट्रेंड सुरु केला आहे. अर्णव गोस्वामी यांनी मल्याळी लोकांबद्दल केलेल्या एका वक्तव्याबद्दल त्यांच्यावर नाव न घेता थरुर यांनी निशाणा साधला आहे. आपण आतापर्यंत इतक्या विचित्र आणि लाज सोडलेल्या भारतीयांना कधीच पाहिलं नव्हतं, असं गोस्वामी काही मल्याळी लोकांना उद्देशून म्हणाले होते.

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी युएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीकडून आपल्या राज्याला ७०० कोटींची मदत जाहीर करण्यात आल्याचं ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं होतं. यानंतरच अर्णव यांनी हे विधान केलं होतं. पण, मुळात अशी कोणत्याच प्रकारची मदत अधिकृतपणे जाहीर करण्यात आली नसल्याचा खुलासा यानंतर युएईचे राजदूत अहमद अल्बाना यांनी केला. दरम्यान, मदतनिधीच्या रकमेवरुन सुरु असलेल्या या चर्चा एका वक्तव्यामुळे वादालाही तोंड फोडून गेल्या. ज्यानंतर सोशल मीडियावर मल्याळी समुदायातील अनेकांनीच अर्णव गोस्वामींविरोधात नाराजीचा सूर आळवला. ज्यात आता खुद्द काँग्रेस नेते शशी थरुर यांनीही उडी घेतली आहे.

वाचा : Kerala Floods BLOG : ओणमच्या निमित्ताने साजरा होणार उत्सव माणुसकीचा, माणसातल्या देवाचा

‘मल्याळी समुदायावर अशा प्रकारे आक्षेपार्ह विधान करत त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्या, कमी बौद्धिक पातळी असणाऱ्या लोकांविरोधात स्वत:च्या अस्तित्वासाठी एकजुटीने उभं राहण्याची गरज आहे. चला… आपल्याला मल्याळी असल्याचा अभिमान का वाटतो, याविषयीची कारणं स्पष्ट करुया… #ProudToBeMalayali’, असं ट्विट त्यांनी केलं. यामागोमागच काही ट्विट करत आपल्याला आपल्या समुदायाचा अभिमान का वाटतो, यामागची कारणंही त्यांनी स्पष्ट केली.

थरुर यांच्या या ट्विटनंतर अनेक नेटकऱ्यांनी पुढे येत त्यांना या ट्रेंडमध्ये साथ देत मल्याळी समाज आणि केरळ या गोष्टींबद्दल आपल्या मनात आदर का आहे आणि ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट का आहे, हे स्पष्ट केलं. त्यामुळे आता सोशल मीडियावर या ट्रेंडचा पूर आला आहे, असंच म्हणावं लागेल.