राज्यापालांच्या मदतीने अरुणाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारला अस्थिर करण्याच्या आरोपांचा पुनरुच्चार करीत काँग्रेस खासदारांनी राज्यसभेत जोरदार गोंधळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत ‘मोदी तेरी तानाशाही, मोदी तेरी हिटलरशाही.. नही चलेंगी’च्या घोषणांनी विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. मोदींसह उपस्थित केंद्रीय मंत्री हा सारा प्रकार हताशपणे पाहत होते. या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.
राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यापासून काँग्रेस खासदारांची घोषणाबाजी सुरू होती. त्यात जराही खंड पडला नाही. प्रश्नोत्तराच्या तासात निदर्शने वाढल्यावर सभापती हामीद अन्सारी यांनी कामकाज अध्र्या तासासाठी तहकूब केले. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी अन्सारी यांची भेट घेतली. अन्सारी यांच्या दालनात झालेल्या बैठकीत मोदी यांना राज्यसभेचे कामकाज ठप्प झाल्याने नाराजी व्यक्त केली. सकाळच्या सत्रात सुरू असलेल्या गोंधळात भर घालण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या खासदारांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या उपस्थितीचे निमित्त मिळाले. ते राज्यसभेत दाखल होताच बसप खासदांनी काँग्रेसच्या सुरात सूर मिसळला. ‘व्ही. के. सिंह मुर्दाबाद’च्या घोषणा सुरू झाल्या.
‘पतंजली कंपनीवर कारवाई करा’
राष्ट्र खाद्य नियंत्रण संस्थेच्या परवानगीशिवाय बाजारात नूडल्स व अन्न खाद्य पदार्थाची विक्री करणाऱ्या बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीवर कारवाई करण्याची मागणी जदयू खासदार के. सी. त्यागी यांनी राज्यसभेत केली. बाबा रामदेव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी जवळीक दाखवतात. लोकसभा निवडणुकीत मोदींना पंतप्रधान करण्यासाठी तन-मन व धनाने काम केल्याचा दावा बाबा रामदेव करतात.