काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षाची गरज असल्याचं पक्षाचे वरिष्ठ नेते शशी थरुर यांनी म्हटलं आहे. तसंच पक्षाच्या संघटनात्मक रचनेत अधिक ऊर्जा निर्माण करण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले आहेत. रिपोर्टर्स टुडेसोबत बोलताना शशी थरुर यांनी रोखठोकपणे आपली भूमिका मांडली असून जर राहुल गांधी यांना अध्यक्षपदी याययचं असेल तर त्यांनी लवकर निर्णय घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

“सोनिया गांधींच्या नेतृत्त्वावर आमचं सर्वांचं प्रेम आहे. अनेकांनी कायमस्वरुपी अध्यक्षाची मागणी केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून आमच्यासाठी कायमस्वरुपी अध्यक्ष नाही. आम्हाला पक्षाच्या संघटनात्मक रचनेत अधिक ऊर्जा निर्माण करण्याची गरज आहे. काँग्रेसकडे कायस्वरुपी अध्यक्ष असावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. कोणीही सोनिया गांधींविरोधात बोलणार नाही. सोनिया गांधींनी आम्हाला सर्वांना योग्य दिशा दाखवत नेतृत्व केलं आहे. पण आता त्यांनीदेखाल पदावरुन पायउतार होण्याची इच्छा व्यक्त केली आहे,” असं शशी थरुर म्हणाले आहेत.

यावेळी शशी थरुर यांनी जर राहुल गांधी यांची पुन्हा पक्षाचं नेतृत्त्व हाती घेण्याची इच्छा असे तर मग ते लवकरात लवकर झालं पाहिजे असंही त्यांनी यावेळी म्हटंल. “सोनिया गांधींनी पद सोडल्यानंतर राहुल गांधींच्या रुपाने नवं नेतृत्त्व उदयाला येताना आम्ही पाहिलं होतं. पण जर आता त्यांनी पुन्हा नेतृत्त्व हाती घ्यायचं असेल तर ते लवकर झालं पाहिजे,” असं मत शशी थरुर यांनी व्यक्त केलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, “२०२४ मध्ये केंद्रात सरकार स्थापन करण्याचं ध्येय समोर ठेवत काँग्रेस पक्ष सध्या मजबुतीने वाटचाल करत आहे. यासाठी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी रणनीती आखली आहे. जर आतापर्यंत झालेल्या गोष्टींमध्ये काही बदल खेले नाहीत तर मतदारांना आपलं मत बदलण्याचं कोणतंही कारण मला दिसत नाही”.