21 September 2020

News Flash

माझ्या हिंमतीला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही, गडकरींचा राहुल गांधींवर पलटवार

माझ्या हिम्मतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. हे मोदीजी आणि आमच्या सरकारचे यश आहे

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याचा शस्त्रासारखा वापर करत विरोधी पक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलेल्या उपरोधिक ट्विटवर गडकरींनी पलटवार केला आहे. एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असूनही तुम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्यासाठी दुसऱ्यांचे खांदे शोधावे लागत आहेत. माध्यमांनी ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा तुम्हाला आधार घ्यावा लागत आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.

गडकरी यांनी राहुल गांधी यांना आपल्या ट्विटमध्ये टॅग करत लिहिले की, माझ्या हिम्मतीसाठी मला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही. पण आश्चर्य याचे वाटते की, एका राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष असतानाही आमच्या सरकारवर हल्ला करण्यासाठी तुम्हाला माध्यमाकडून ट्विस्ट केलेल्या बातम्यांचा आधार घ्यावा लागत आहे. हे मोदीजी आणि आमच्या सरकारचे यश आहे की, तुम्हाला आमच्यावर हल्ला करण्यासाठी खांदे शोधावे लागत आहेत.

गडकरीजी तुमचे कौतुक! भाजपामध्ये थोडीफार हिम्मत असलेले तुम्ही एकमेव नेते आहात. आता राफेल घोटाळा, अनिल अंबानी, शेतकऱ्यांमधली अस्वस्थतता, संस्थांचे नुकसान यावर सुद्धा काहीतरी बोला असे राहुल यांनी उपरोधिकपणे म्हटले होते. नितीन गडकरी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात पक्ष कार्यकर्त्यांना आधी घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करा. जो घरची जबाबदारी पूर्ण करु शकत नाही तो देश चालवू शकत नाही असे म्हटले होते.

गडकरी यांनी या प्रश्नांची उत्तरे आपल्या ट्विटमधून दिली आहेत. तुम्ही उपस्थित केलेल्या मुद्यांविषयी बोलायचे म्हटले तर राफेलमध्ये आमच्या सरकारने देश हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शक व्यवहार केला आहे. तुमच्या धोरणांमुळे शेतकऱ्याची जी अवस्था झाली आहे. त्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रामाणिक प्रयत्न मोदी करत आहेत. आम्हाला त्यात यशही मिळत आहे. तुमच्यासह काही लोकांना मोदी हे पंतप्रधान नको आहेत. त्यामुळे तुम्हाला असहिष्णुता व संवैधानिक संस्थांवर हल्ल्यांची स्वप्ने पडत आहेत.

आमच्या आणि काँग्रेसच्या डीएनएमध्ये हेच अंतर आहे. आम्ही लोकशाही आणि संवैधानिक संस्थांवर विश्वास ठेवतो. तुमची चाल यशस्वी होणार नाही. मोदी हे पुन्हा पंतप्रधान बनतील आणि मोठ्या मजबुतीने आम्ही देश पुढे नेऊ. पण भविष्यात तुमच्याकडून समजूतदार आणि जबाबदारीपूर्ण वर्तणुकीची अपेक्षा करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 4:55 am

Web Title: congress needs shoulder to attack government nitin gadkari hits back to rahul gandhi
Next Stories
1 अमेरिकेतून परतल्या प्रियंका, राहुल गांधींबरोबर गुरूवारी होणार पहिली बैठक
2 गजेंद्र चौहान म्हणाले, नरेंद्र मोदी हे आधुनिक युगातील युधिष्ठिर
3 एनडीएचे दरवाजे उघडण्यास कोण विचारलंय, चंद्राबाबूंचा नायडूंचा पलटवार
Just Now!
X