नवी दिल्ली : विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवाची गंभीर दखल घ्यावी लागेल आणि त्यातून योग्य तो धडा घेऊन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर पक्षात आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतील, असे प्रतिपादन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोमवारी केले.

काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या (सीडब्ल्यूसी) अत्यंत महत्त्वपूर्ण बैठकीला संबोधित करताना सोनिया गांधी म्हणाल्या की, निवडणुकीत पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागला त्यामागील प्रत्येक कारणाची मीमांसा करण्यासाठी एक छोटा गट स्थापन करण्याची आणि दिलेल्या कारणांबाबत ऊहापोह करण्याची आपली इच्छा आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभव पत्करावा लागला त्याबाबत आत्मचिंतन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

काँग्रेसचे कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली, पश्चिम बंगालमध्ये पक्षाची पाटी कोरी राहिली, तर केरळ आणि आसाममध्ये पुन्हा सत्ता काबीज करता आली नाही आणि पुदुचेरीतही पराभव पत्करावा लागला. तामिळनाडूतच केवळ द्रमुकच्या मदतीने पक्ष सत्तेवर आला आहे. या सर्व बाबींची गंभीरपणे नोंद घ्यावी लागणार आहे, असे त्या उद्घाटनपर भाषणात म्हणाल्या.

केरळ आणि आसाममध्ये आपण सत्तारूढ पक्षाला सत्तेवरून खाली का खेचू शकलो नाही आणि पश्चिम बंगालमध्ये आपली पाटी कोरी का राहिली हे पक्षाने स्पष्टपणे समजून घेणे गरजेचे आहे. आपण वस्तुस्थिती समजून घेतली नाही तर पराभवाची योग्य कारणमीमांसा होऊ शकणार नाही, असे सोनिया यांनी नमूद केले.

आपण कमी का पडलो त्याची कारणे पदाधिकाऱ्यांनी मोकळेपणाने  सांगावी, असे गांधी म्हणाल्या.