मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयाचा फायदा लोकसभा निवडणुकीतही उचलण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. यासाठी पक्षाकडून जोरदार तयारी देखील सुरू करण्यात आली आहे. अशातच काँग्रेसच्या काही आमदारांनी भोपाळच्या लोकसभा जागेवर विजयाचा फॉर्म्युला शोधला आहे. भोपाळमधून कोणा राजकारण्याला उमेदवारी न देता बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खानला उमेदवारी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे.

‘भोपाळच्या जागेवर गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचं निर्विवाद वर्चस्व आहे. त्यामुळे जर करिना कपूरला उमेदवारी दिली तर तिला तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळू शकतो आणि भाजपाच्या बालेकिल्ल्याला हादरा देऊ शकतो. याशिवाय, करिना कपूर ही पतौडी कुटुंबाची सून झालीये, परिणामी जुन्या भोपाळमध्ये काँग्रेसला तिच्या उमेदवारीचा चांगला फायदा होऊ शकतो. महिला असल्यामुळे महिलांकडूनही तिला पाठिंबा मिळेल’, असं काँग्रेसचे मध्य प्रदेशमधील नेते गुडडू चौहान आणि अनीस खान यांचं म्हणणं आहे. लवकरच या मागणीसाठी हे नेते मुख्यमंत्री कमलनाथ यांची भेटही घेणार आहेत. ‘इंडिया टुडे’ने याबाबतचं वृत्त दिलंय.

पतौडी कुटुंब गेल्या कित्येक वर्षांपासून भोपाळमध्ये स्थायिक आहे. सैफ, करिना, शर्मिला टागोर आणि सोहा अली खान अनेकदा भोपाळला येऊन देखील गेले आहेत. मात्र, मंसुर अली खान पतौडी यांनी १९९१ मध्ये भोपाळमधून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे, करिना आता काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवणार का आणि आपल्या नेत्यांच्या मागणीला काँग्रेस पक्ष कसा प्रतिसाद देतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे, काँग्रेस नेत्यांच्या या मागणीवर भाजपाच्या नेत्यांनी टोला लगावला आहे. काँग्रेसकडे नेते उरले नाहीत त्यामुळे त्यांना आता अभिनेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे, अशी टीका भोपाळमधून भाजपाचे खासदार आलोक संजय यांनी केली आहे.