लोकसभेत विरोधीपक्षनेतेपद देण्याची विनंती करणारे कोणतेही पत्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना लिहिले नसल्याच्या दावा काँग्रेस प्रवक्ते शकील अहमद यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसने महाजन यांच्याकडे पत्राद्वारे याचना केल्याचे वृत्त पसरले होते.
लोकसभेत अवघ्या ४४ सदस्यांच्या जोरावर काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगता येणार नाही. विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान ५४ सदस्यांची गरज असते. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. मात्र लोकसभा अध्यक्ष विशेषाधिकाराचा वापर करून काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद देऊ शकतात. केंद्रीय मंत्री वेंकय्या नायडू यांनीदेखील विरोधी पक्षनेता असावा अथवा नाही, हा सर्वस्वी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचा अधिकार असल्याचे सांगत काँग्रेससमोरील अडचणी वाढवल्या. त्यानंतर सोनिया गांधी यांनी सुमित्रा महाजन यांना विरोधी पक्षनेतेपद देण्याची विनंती करणारे पत्र लिहिल्याचे वृत्त पसरले होते.

जद(यु)चा काँग्रेसला पाठिंबा
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याबाबत जद(यू)ने मात्र काँग्रेसला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभेत जद(यू)चे केवळ दोनच खासदार आहेत. केंद्रीय दक्षता आयोग, राष्ट्रीय मानव हक्क आयोग आणि लोकपाल यांच्यासारख्या महत्त्वाच्या नियुक्त्यांच्या समितीवर विरोधी पक्षनेता असतो.त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद द्यावे, असेही त्यागी यांनी म्हटले आहे.