तेलंगणा प्रश्न हाताळण्यास काँग्रेसला सपशेल अपयश आल्याची टीका भाजपने केली असून या प्रश्नाबाबत काँग्रेसच्या प्रामाणिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाच्या भूमिकेला छेद देऊन तेलंगणा निर्मितीला विरोध करणाऱ्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी का करण्यात आली नाही, असा सवालही भाजपने केला आहे.
तेलंगणा राज्याची निर्मिती व सीमांध्रवासीयांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्याबाबत काँग्रेसची भूमिका अप्रामाणिक आहे. पक्षाची भूमिका प्रामाणिकपणाची असती, तर काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाला विरोध करणाऱ्या नेत्यांची हकालपट्टी झाली असती, असे भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे.
या प्रश्नावर काँग्रेसला आपला प्रामाणिकपणा सिद्ध करावयाचा असेल, तर त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करावी. मात्र काँग्रेस काहीच करीत नाही. त्यांच्याच पक्षाचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी धरणे धरून बसतात, त्यांचेच खासदार संसदेच्या कामात अडथळे आणतात आणि अविश्वासाचा ठरावही आणतात, असेही जावडेकर म्हणाले.
या सरकारला तेलंगणा अथवा आंध्र प्रदेशबद्दल काहीही देणेघेणे नाही. या प्रश्नावर राजकारण करण्यातच त्यांना केवळ रस आहे, असे भाजपचे नेते रविशंकर प्रसाद म्हणाले.
भागवतांवरील आरोप बिनबुडाचे -तावडे
नांदेड : रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरील आरोप बिनबुडाचे आहेत. स्वत:चा टीआरपी वाढविण्यासाठी काही माध्यमे या प्रकरणाला नको तेवढी प्रसिद्धी देत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी केला.  लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यासाठी तावडे यांच्या नेतृत्वाखालील समिती येथे दाखल झाली. मुलाखती घेतल्यानंतर समितीने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. त्यानंतर पत्रकार बैठकीत तावडे यांनी वरील आरोप केला. जबाबदार संघटनेच्या प्रमुखाबद्दल अशाप्रकारे आरोप करण्याची कृती िनदनीय आहे, असेही ते म्हणाल़े