नेतृत्त्वाच्या समस्येमुळेच काँग्रेस पक्षाच्या देशभरातील लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे सांगत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी राहुल गांधींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. काँग्रेस पक्ष हा एखाद्या कालबाह्य झालेल्या कारच्या उत्पादकासारखा बनला आहे. यापूर्वी एकाधिकारशाही असल्यामुळे हा उत्पादक तगू शकला. मात्र, आता तशी परिस्थिती राहिली नसल्याचे जेटलींनी यावेळी सांगितले.
तुम्ही देशभरातील प्रत्येक राज्यात जाऊन पाहाल तर काँग्रेस त्यांच्या पक्षातील अनेक नेते गमावत असल्याचे दिसून येईल. माझ्या मते याची दोन प्रमुख कारणे आहेत. एक म्हणजे तब्बल सहा दशकांची परंपरा असलेल्या काँग्रेसने आता अचानकपणे भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. राजकारणाच्या मुख्य प्रवाहातील पक्ष अशाप्रकारे भूमिका घेताना दिसत नाहीत. दुसरे कारण म्हणजे पक्षातील नेत्यांचे अपयश. काँग्रेसमध्ये गुणवत्तेच्या आधारावर नेत्यांची निवड होत नसल्याचे प्रतिबिंब पक्ष कारभारात पडत आहे. याशिवाय, पक्षातील अनेक नेत्यांचा पक्षनेतृत्त्व किंवा पक्षातील धोरणकर्त्यांशी असलेल्या संवादाचा अभाव काँग्रेसच्या अपयशाचे कारण असल्याचे जेटलींनी सांगितले. देशात आजही कुटुंब केंद्रित असलेले अनेक पक्ष आहेत. मात्र, या पक्षांतील नव्या पिढीची पक्षाला बांधून ठेवण्याच्या क्षमतेवरच संबंधित पक्षाची ताकद अवलंबून आहे. मात्र, यामध्ये काँग्रेस पक्ष सपशेल अपयशी ठरत असल्याचे जेटलींनी म्हटले.