गायक-संगीतकार अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने त्यावरून टीकास्त्र डागलं आहे. ‘एनआरसी आणि सरकारची चमचेगिरी केल्याचा परिणाम म्हणून हा पुरस्कार देण्यात आला आहे?,’ असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रवक्ता जयवीर शेरगील यांनी विचारला आहे. ‘भारतरत्न’ या सर्वोच्च नागरी पुरस्कारानंतर प्रतिष्ठेचे पद्म पुरस्कार २५ जानेवारी रोजी जाहीर करण्यात आले. यात अदनान सामीचाही समावेश आहे.

अदनान सामीला पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर टीका होऊ लागली आहे. काँग्रेसनंही टीकास्त्र सोडलं आहे. “कारगील युद्धामध्ये आपलं सर्वस्व झोकून देणारे आणि माजी लष्कर अधिकारी मोहम्मद सनाउल्लाह यांना विदेशी म्हणून घोषित केलं. तर दुसरीकडं भारताविरुद्ध लढणाऱ्या एका पाकिस्तानी हवाई दलातील वैमानिकाच्या मुलाला देशातील प्रतिष्ठेच्या नागरी पुरस्कारानं गौरविण्यात येत आहे. एनआरसी आणि सरकारची चमचेगिरी केल्यामुळे हे घडलं आहे”, अशी टीका जयवीर शेरगील यांनी केली आहे.


महाराष्ट्रातून मनसेचाही विरोध-

अदनान सामीला पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसप्रमाणेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंदेखील (मनसे) विरोध केला आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी यासंदर्भात ट्विटद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. अदनान सामी यांचा जन्म लंडनमध्ये झाला असून, त्यांचे वडील पाकिस्तानच्या हवाई दलामध्ये वैमानिक होते. अदनाननं २०१५ मध्ये भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज केला होता. त्यानंतर २०१६ मध्ये त्याला भारतीय नागरिकत्व देण्यात आलं.