राजस्थानमध्ये बंडाचा झेंडा हाती घेणाऱ्या सचिन पायलट यांची काँग्रेसने मंगळवारी उपमुख्यमंत्रिपद, प्रदेशाध्यक्षपदा-वरून हकालपट्टी केली. यामुळे अशोक गेहलोत सरकारचे बहुमत काठावर आले असून, पायलट समर्थक आमदारांसह भाजपने शक्तिपरीक्षेची मागणी केली आहे.

जयपूरमध्ये काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची पुन्हा मंगळवारी बैठक झाली. पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी या बैठकीकडे पाठ फिरवली. त्यानंतर पायलट यांच्यासह त्यांचे समर्थक विश्वेंदर सिंह आणि अशोक मीना यांचीही मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची घोषणा काँग्रेसने केली.

या बैठकीनंतर १०४ आमदारांच्या समर्थनाचे पत्र मुख्यमंत्री गेहलोत यांनी राज्यपाल कलराज मिश्र यांच्याकडे दिले. राजस्थानच्या २०० सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी १०१ सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. त्यामुळे गेहलोत यांना सरकार वाचवण्यासाठी तारेवरील कसरत करावी लागणार आहे. काँग्रेसचे १०७ सदस्य, १३ अपक्ष आमदार आणि पाच छोटय़ा पक्षांचे सदस्य असे १२५ सदस्यांचे समर्थन गेहलोत सरकारला होते. मात्र तीन अपक्षांनी आधीच पाठिंबा काढून घेतला असून उर्वरित अपक्षांपैकी काहींनी पायलट यांना समर्थन दिले आहे.

भारतीय ट्रायबल पक्षाचे दोन सदस्य तटस्थ राहिले आहेत. त्यामुळे गेहलोत सरकारकडे काठावरील बहुमत आहे.

सचिन पायलट हे आपल्या १६ समर्थक आमदारांसह तीन दिवस दिल्लीत वास्तव्यास आहेत. या आमदारांच्या दिल्लीतील उपस्थितीची चित्रफीत मंगळवारी पायलट गटाकडून प्रसारित करण्यात आली. पायलट यांच्याकडे २० आमदारांचे संख्याबळ असल्याचे मानले जाते. राजस्थान विधानसभेत गेहलोत सरकारला बहुमत सिद्ध करण्याची वेळ आली तर मंगळवारी काँग्रेसच्या बैठकीला हजर असलेले काही आमदार पायलट यांच्या बाजूने जाऊ शकतील, असे मानले जाते. त्यामुळे मुख्यमंत्री गेहलोत यांच्या समर्थक आमदारांची संख्या ९० पेक्षा जास्त नसल्याचा दावा पायलट गटाकडून केला जात आहे.

मध्यस्थी अपयशी

सलग तीन दिवस काँग्रेसकडून सचिन पायलट यांच्याशी संपर्क साधला जात होता. मंगळवारी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी-वढेरा यांनी फोनवरून पायलट यांच्याशी चर्चा केली. मात्र, पायलट यांनी मुख्यमंत्रीपदाचा आग्रह न सोडल्याने काँग्रेस नेतृत्वाची मध्यस्थी अपयशी ठरली. पायलट यांनी जयपूरला जाऊन विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला उपस्थित राहावे, अशी विनंती करण्यात आली होती. मात्र, पायलट बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. मंत्रीपदावरून हकालपट्टी केल्यानंतर पायलट यांनी पहिल्यांदाच संपूर्ण सत्तासंघर्षांवर प्रतिक्रिया व्यक्त केली. सत्याचा पराभव केला जाऊ शकत नाही, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले. तसेच पायलट यांनी आपल्याला पाठिंबा देणाऱ्यांचे आभारही मानले. पायलट हे बुधवारी पत्रकार परिषद घेऊन पुढील राजकीय वाटचाल स्पष्ट करणार आहेत.

भाजपकडून हालचाली

सचिन पायलट हे भाजपच्या संपर्कात असून केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या मदतीने राजस्थानमधील सरकार अस्थिर करण्याचा डाव आखला जात होता, असा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला. आपण भाजपमध्ये जाणार नसल्याचे पायलट यांनी आधीच स्पष्ट केले असले तरी, रविवारी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या भेटीवेळी भाजपचे राजस्थानातील नेते उपस्थित असल्याचे सांगितले जाते. शिवाय, भाजपचे नेतृत्वही पायलट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत असल्याचाही दावा काँग्रेसच्या नेत्यांनी केला आहे. राजस्थानमधील भाजप नेत्यांनी बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. भाजपकडे ७३ आमदार असून त्यांना बहुमतासाठी २८ आमदार कमी पडतील.