News Flash

“तुम्ही दावा केलेल्या ‘त्या’ युद्धाचं काय झालं?” पी. चिदंबरम यांचा पंतप्रधानांना सवाल!

लस पुरवठ्यामध्ये अपयश आल्याचं म्हणत काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

“केंद्र सरकार कधी लसीकरण मोहिमेला उत्सव म्हणतंय, तर दुसऱ्या दिवशी त्याला दुसरं युद्ध म्हणतंय. हे नेमकं काय आहे?”, अशा शब्दांत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांनी भाजपाप्रणीत केंद्र सरकारला परखड सवाल केला आहे. तसेच, “आठवून पाहा, पंतप्रधानांनी सगळ्यात पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली, तेव्हा त्यांनी २१ दिवसांत हे युद्ध जिंकण्याचा दावा केला होता. त्याचं काय झालं?” असं देखील पी. चिदंबरम यांनी म्हटलं आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून ट्वीट करून त्यांनी देशातील लसीकरण मोहीम आणि लसींचा तुटवडा यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली आहे.

 

गेल्या काही दिवसांपासून काही राज्यांकडून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे डोस अपुरे पडत असल्याची तक्रार केली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश होता. राज्याच्या काही भागांमध्ये लसींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे लसीकरण थांबवावं लागल्याचं देखील राज्य सरकारकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे केंद्र सरकारकडूनच लसीच्या पुरवठ्याचं योग्य नियोजन केलं जात नसल्याची टीका महाराष्ट्रासह इतरही काही राज्यांनी केली होती. त्यावरून आता पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारला लक्ष्य केलं आहे.

फक्त पोकळ दावे आणि मोठ्या गोष्टी!

दरम्यान, केंद्र सरकारकडून लसीकरणाविषयी फक्त पोकळ दावे केले जात असल्याचं चिदंबरम यांनी ट्वीटमध्य म्हटलं आहे. “पहिल्या लॉकडाऊनची घोषणा करताना २१ दिवसांत करोनाविरोधातलं युद्ध जिंकण्याचा दावा पंतप्रधानांनी केला होता. महाभारतातलं युद्ध देखील १८ दिवसांत जिंकलं होतं. आता त्या युद्धाचं काय झालं? फक्त पोकळ दावे आणि मोठ्या वक्तव्यांनी करोनाविरोधातल्या लढ्याला यश मिळणार नाही. लसीकरणाच्या पुरवठ्यामध्ये आणि वितरणामध्ये आलेलं अपयश लपवण्याचा प्रयत्न सरकार करते आहे”, असं चिदंबरम म्हणाले आहेत.

 

लॉकडाउनवरुन फडणवीसांची ठाकरे सरकारवर जोरदार टीका; म्हणाले…

मागेल त्याला लसीकरण हवं!

दरम्यान, रविवारी देखील त्यांनी ट्वीटरवरून सरकारवर निशाणा साधला होता. “लसीकरण मोहिमेला जर सरकार उत्सव म्हणत असेल, तर त्याला कोण काय म्हणणार? कोणत्याही दृष्टीकोणातून हा उत्सव नाही. मागेल त्याला लसीकरण व्हायला हवं. केंद्र सरकारने तातडीने लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी निधी उपलब्ध करून देऊन लसींचा पुरवठा वाढवायला हवा.”

देशात एकीकडे करोना लसींचा तुटवडा असल्याच्या तक्रारी येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ एप्रिल ते १४ एप्रिल या काळात लसीकरण उत्सव साजरा करण्याची घोषणा केली होती. या काळात ४५ वर्षांवरील अधिकाधिक नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचं आवाहन मोदींनी केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2021 1:23 pm

Web Title: congress p chidambaram slams pm narendra modi on vaccination in india pmw 88
Next Stories
1 …अन् मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून आईनेही सोडला जीव; एकत्र करण्यात आले अंत्यसंस्कार
2 सुप्रीम कोर्टाचे ५० टक्के कर्मचारी करोनाबाधित; न्यायाधीश WFH
3 भयावह रुग्णवाढ! देशात २४ तासांत आढळले १,६८,९१२ पॉझिटिव्ह रुग्ण
Just Now!
X