काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना दहशतवादी मसुद अझहरचा उल्लेख मसुद अझहरजी असा केल्याने वाद निर्माण झाला असून भाजपाचे प्रवक्ते शाहनवाझ हुसैन यांनी याच मुद्द्यावरुन काँग्रेसवर निशाणा साधला आहे. आपल्या जवानांची हत्या करणाऱ्यांचा अशा पद्धतीने आदर करणे हे देशातील जनता खपवून घेणार नाही. काँग्रेस आणि पाकिस्तान दोघेही दहशतवाद्यांवर प्रेम करतात, अशी टीका त्यांनी केली आहे.

मसूद अझहर हा जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या असून पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ला त्यानेच घडवला होता. सोमवारी एका कार्यक्रमात राहुल गांधी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यावर टीका करताना दहशतवादी मसूद अझहरचा उल्लेख मसुद अझहरजी असा केला. यावरुन वाद निर्माण झाला असून भाजपानेही राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.

भाजपा नेते शाहनवाझ हुसैन यांनी ट्विटरवरद्वारे राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. “काँग्रेस नेत्यांनी यापूर्वी ओसामा बिन लादेनचा उल्लेख ओसामाजी केला आहे. इतकंच नव्हे तर हाफिज सईदला ‘साहेब’ म्हटले आहे. आता राहुल गांधी मसूद अझहरचा उल्लेख अझहरजी असा करत आहे. जवानांची हत्या करणाऱ्यांचा अशा पद्धतीने आदर करणे हे देशातील जनता खपवून घेणार नाही. काँगेस आणि पाकिस्तान या दोघांचे दहशतवाद्यांवर प्रेम आहे”, अशी टीका शाहनवाज हुसैन यांनी केली आहे. काँग्रेसला हे विधान महागात पडणार असून राहुल गांधी यांनी हे विधान करण्यापूर्वी शहीद जवानांच्या कुटुंबीयांचा तरी विचार केला पाहिजे होता, असेही त्यांनी म्हटले आहे. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान करायचा आणि दहशतवाद्याला आदर द्यायचा, काँग्रेसच्या या मानसिकतेला देशातील जनताच धडा शिकवणार, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही राहुल गांधींवर अशाच स्वरुपाची टीका केली होती. राहुल गांधी आणि पाकिस्तान या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते म्हणजे दहशतवाद्यांबद्दल वाटणारे प्रेम आहे असे स्मृती इराणींनी म्हटले होते. तर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील काँग्रेसला नेमकं काय झालंय?, असा प्रश्न उपस्थित केला होता. तर केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी देखील काँग्रेसला नेमकं काय झालंय?, असा प्रश्न उपस्थित केला होता. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी देखील राहुल गांधीवर टीका केली असून जिभेला नव्हे तर मानसिकतेला दोष दिले पाहिजे, असे संबित पात्रा यांनी म्हटले आहे.