कर्नाटक व उत्तर प्रदेशमध्ये ‘डागाळलेल्या’ नेत्यांच्या हाती नेतृत्वाची धुरा सोपवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी भाजपवर जोरदार टीका केली. मात्र, ज्यांचे सर्वोच्च नेतृत्व कथित घोटाळ्याच्या गुन्हय़ात जामिनावर आहे त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा काहीही नैतिक अधिकार नसल्याचा भीमटोला भाजपने लगावला.
कर्नाटकचे अध्यक्ष नेमण्यात आलेले बी.एस. येदियुरप्पा यांनी मुख्यमंत्री असताना केलेल्या भ्रष्टाचाराबद्दल त्यांना तुरुंगात पाठवण्यात आले होते; तर उत्तर प्रदेशचे अध्यक्ष केशवप्रसाद मौर्य यांच्याविरुद्ध खुनासह दहा गुन्हे दाखल आहेत. या नेमणुकांमुळे भाजपने केलेल्या सचोटीचे आश्वासन पोकळ असल्याचे दिसून आल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केली.
भाजपने मात्र आपल्या नेत्यांवरील आरोप निराधार असल्याचे जोरदार प्रत्युत्तर दिले. ज्यांनी गेली दहा वर्षे भ्रष्ट कारभार केला त्यांना भ्रष्टाचाराबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही, असे प्रत्युत्तर भाजप सरचिटणीस श्रीकांत शर्मा यांनी दिले.