News Flash

राजस्थानमध्ये भाजपला धक्का

तिन्ही जागांवर काँग्रेस विजयी

तिन्ही जागांवर काँग्रेस विजयी; पश्चिम बंगालमध्ये तृणमूलची बाजी

राजस्थान विधानसभा निवडणुकीचे बिगूल वाजू लागले असतानाच राज्यातील तिन्ही मतदारसंघांतील पोटनिवडणुकांमध्ये सत्ताधारी भाजपचा दारुण पराभव झाल्याने सत्ताधारी पक्षाच्या विरोधात वातावरण तयार झाल्याचे मानण्यात येते. तर   तिन्ही जागा जिंकून काँग्रेसने रंगीत तालिमीत तरी बाजी मारली आहे.  पश्चिम बंगालमधील दोन्ही जागा सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने जिंकल्या असल्या तरी दोन्ही ठिकाणी भाजप दुसऱ्या क्रमाकांवार आल्याने डावे पक्ष आणि काँग्रेससाठी सूचक इशारा मानला जातो.

राजस्थानमध्ये अजमेर आणि अल्वार या दोन लोकसभेच्या तर विधानसभेच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय प्राप्त केला. तिन्ही जागा काँग्रेसने चांगल्या मताधिक्याने जिंकल्याने सत्ताधारी भाजपसाठी हा धोक्याचा इशाराच मानला जातो. गेल्या लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधील सर्व २५ जागा भाजपने जिंकल्या होत्या. पण अजमेर आणि अल्वार या दोन्ही मतदारसंघातील पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचा धक्का बसला. अल्वार लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार सुमारे दोन लाखांच्या मताधिक्याने विजयी झाला. अजमेरमध्ये काँग्रेसला ८० हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली. मंडलगड विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार १३ हजार मतांनी विजयी झाला. हे तिन्ही मतदारसंघ आधी भाजपच्या ताब्यात होते.

राजस्थानमधील निकाल हा मुख्यमंत्री वसुधंराराजे यांना मोठा धक्का मानला जातो. वसुंधराराजे यांच्या कार्यपद्धतीवरून सत्ताधारी भाजपमध्येच तीव्र नापसंती व्यक्त केली जाते. तिन्ही मतदारसंघात दारुण पराभव झाल्याने सत्ताधारी भाजपला आगामी निवडणुकीकरिता आपली रणनीती ठरविताना विचार करावा लागणार आहे. वसुंधराराजे यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवावे, अशी भाजपच्या काही आमदारांनी यापूर्वीच मागणी केली होती.

शेतकरी वर्गात असलेल्या नाराजीचा फटका गुजरातप्रमाणेच राजस्थानमध्ये बसला आहे. याशिवाय भाजपच्या विरोधात मोठय़ा प्रमाणावर नाराजी आहे. हे सारे मुद्दे भाजपला त्रासदायक ठरले आहेत. ‘बदलाचे वारे चोहोबाजूने वाहू लागले आहेत’ अशी बोलकी प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी व्यक्त केली आहे. राजस्थानमधील जनतेने भाजपला नाकारले आहे. हाच कल पुढे सर्वत्र बघायला मिळेल, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे. राजस्थान विधानसभा निवडणूक या वर्षांअखेर अपेक्षित आहे. तिन्ही मतदारसंघात दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने भाजप नेत्यांना विचार करावा लागणार आहे.

ममतादिदी निर्धास्त

राजस्थानमध्ये मुख्यमंत्री वसुंधराराजे यांना मोठा धक्का बसला असतानाच पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने दोन्ही जागा जिंकून विरोधकांवर मात केली. पश्चिम बंगालमध्ये शिरकाव करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या भाजपला दोन्ही मतदारसंघांमध्ये दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याने राजकीय समीकरणे बदलू लागल्याची लक्षणे मानली जातात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2018 1:32 am

Web Title: congress party beat bjp in rajasthan
Next Stories
1 रा. स्व. संघाची कामगार संघटना अर्थसंकल्पावर नाराज; उद्या देशभरात निदर्शने करणार
2 Budget 2018 : भाजपाचे विरोधात असताना एक आणि सत्तेत आल्यानंतर भलतेच!
3 Budget 2018 : संरक्षण क्षेत्रासाठी ३ लाख कोटींची भरीव तरतुद; पेन्शनसाठी अतिरिक्त १ लाख कोटी
Just Now!
X