‘आम्ही आदिवासी हक्क कायदा आणला मात्र, भाजपाला तो लागू करायचा नाही. मात्र, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढमध्ये आम्ही सत्तेत आलो तर लवकरात लवकर ‘आदिवासी हक्क कायद्या’ची (अनुसूचित जमाती आणि इतर पारंपारिक वनवासी (वन अधिकार ओळख) अधिनियम, २००६) अंमलबजावणी करु’, असे आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिले आहे.

माझ्या सर्व कृतींमधून मी नेहमीच लोकांच्या हक्कांचा विचार केला आहे. त्याअनुशंगाने सध्याच्या भाजपा सरकारने वेगळ्या पडलेल्या आदिवासी समाजाचे हक्क हिरावून घेतले आहेत. हे हक्क आदिवासी बांधवांना परत मिळवून देण्याचे मी त्यांना वचन देतो, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. भाजपाने नेहमीच अशा वर्गाची पिळवणूक केली आहे. मात्र, काँग्रेस नेहमीच पीडितांच्या बाजूने उभी राहिली असून यापुढेही राहिल, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

राहुल म्हणाले, आज शेतकरी, आदिवासी, दलित आणि अल्पसंख्यांकांचे शोषण केले जात आहे. एक-एक करुन त्यांचे अधिकार काढून घेतले जात आहेत. एका बाजूला भाजपा असून दुसऱ्या बाजूला वेगळा पडलेला हा समाज आहे. मात्र, काँग्रेस पक्ष नेहमीच या समाजाच्या बाजूने उभा राहिला आहे. आम्ही तुम्हाला वचन देतो की, पाणी, जंगल आणि जमीन हे तुमचे हक्क तुम्हाला मिळवून देऊ, आपल्या वचनापासून काँग्रेस कधीही माघार घेणार नाही.

मोदी सरकारवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, सरकारने राफेल व्यवहारातून अनिल अंबानींना जो पैसा दिला आहे. तो देशात मनरेगा योजनेसाठी वापरायला हवा होता. या योजनेच्या माध्यमांतून काँग्रेसने तळागळातील लोकांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले. तु्म्हीच निवडलेल्या ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण करणे हाच आमचा प्रामाणिक हेतू होता. मनरेगासाठी काँग्रेसने ३५,००० कोटींचा निधी दिला. मात्र, भाजपा सरकारने हा सर्व निधी काढून घेतला. हीच रक्कम नीरव मोदीने चोरली आहे. त्याचबरोबर ३०,००० हजार कोटी अनिल अंबानींना देण्यात आले आहेत, अशा आरोपही त्यांनी यावेळी भाजपावर केला.

भाजपा काँग्रेसवर वारंवार आरोप करते की, गेल्या ७० वर्षांत तुम्ही काहीच केले नाही. मात्र, काँग्रेसने या ७० वर्षांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले. या निर्णयांमध्ये राज्यघटनेची बांधणी, मतदानाचा अधिकार, हरितक्रांती, श्वेतक्रांती यांचा समावेश आहे. याद्वारे स्वातंत्र्यानंतरच्या भारतात प्रत्येकाच्या वैयक्तिक सक्षमीकरणामुळेच भारत आज जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, असे यावेळी राहुल गांधी म्हणाले.