नरेंद्र मोदी यांनी संसदेत माफी मागावी; काँग्रेसची आग्रही मागणी
उत्तराखंडमध्ये काँग्रेसचे सरकार पुनस्र्थापित झाल्याने आनंदित झालेल्या काँग्रेसने बुधवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढविला. यापुढे विरोधी पक्षांची सरकारे उलथून टाकण्याचे प्रयत्न होणार नाहीत आणि लोकशाहीची हत्या करण्याचे प्रकार थांबतील, अशी अपेक्षा असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. तसेच, पंतप्रधानांनी संसदेत माफी मागावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
उत्तराखंडमधील विश्वासदर्शक ठरावाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात जाहीर होताच काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभागृहाला घडामोडींची माहिती दिली. आता केंद्र सरकार राष्ट्रपती राजवट जारी करण्याचे आणि लोकशाहीची हत्या करण्याचे प्रकार थांबवेल, अशी अपेक्षा खरगे यांनी व्यक्त केली.
तेव्हा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या अन्य सदस्यांनी त्याचे बाके वाजवून जोरदार स्वागत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसही त्यामध्ये सहभागी झाली. मात्र भाजपच्या सदस्यांनी या वेळी जोरदार निषेध नोंदविला.
या प्रकारामुळे सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज दुपारच्या सुट्टीसाठी तहकूब केले.

‘उत्तराखंडमध्ये लोकशाही विजयी’
नवी दिल्ली : भाजपने अत्यंत वाईट कृती केली, परंतु उत्तराखंडमध्ये लोकशाही विजयी झाली, अशा प्रकारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
देशातील जनता लोकशाहीची हत्या सहन करणार नाही, हा धडा पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार शिकेल, अशी अपेक्षाही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.
काँग्रेसचे नेते हरीश रावत यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले आहे यात शंका नाही, असे केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केले.
भाजपने अत्यंत वाईट कृती केली, तर आम्ही सर्वोत्तम तेच केले, उत्तराखंडमध्ये लोकशाहीचा विजय झाला, असे राहुल गांधी यांनी ट्वीट केले आहे. देशातील जनता आणि देशाच्या संस्थापकांनी उभारलेली संस्था लोकशाहीची हत्या कदापि सहन करणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.