सरकारच्या कामगिरीवर विरोधकांची टीका
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात दिलेली आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली नाहीत, अशी टीका विरोधकांनी दोन वर्षांच्या कारकीर्दीवर केली आहे. मोदींचा उल्लेख काँग्रेसने सपनों का सौदागर असा केला आहे.
जनविरोधी तसेच उद्योग जगताला अनुकूल अशी धोरणे सरकार राबवत असल्याचा आरोप बिजु जनता दलाने केला आहे. तर महागाई रोखण्यात सरकारला अपयश आल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. तर सरकारने विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचा दृष्टिकोन नकारात्मक असल्याची टीका केंद्रीय मंत्री कलराज मिश्र यांनी केली आहे.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे. दिलेली आश्वासने न पाळणारे मोदी हे सपनों के सौदागर आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली. दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त दिल्लीतील इंडिया गेटवरील कार्यक्रमात पंतप्रधानांनी जे भाषण केले ते दिशाभूल करणारे होते, असा आरोप शर्मा यांनी केला.

हा विकास करा?
लाखो बेरोजगार होत आहेत. गुंतवणूक व निर्यातीमध्ये घसरण आहे, अशा वेळी प्रगती झाली असे कसे म्हणणार, असा सवाल शर्मा यांनी लखनौमध्ये बोलताना केला. तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने संघराज्य व्यवस्था मोडीत काढल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते मनीष तिवारी यांनी केला आहे. बिजु जनता दलाचे नेते तथागत सत्पथी यांनी मोदी सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याची टीका केली आहे.