27 February 2021

News Flash

गुजरात, हिमाचलमध्ये मतपत्रिका वापरा

बसप व समाजवादी पक्षाच्या आक्रमक भूमिकेने राज्यसभा दणाणली

राज्यसभेत बुधवारी मतदान यंत्रांवरून गदारोळ झाला.

काँग्रेसची मागणी; बसप व समाजवादी पक्षाच्या आक्रमक भूमिकेने राज्यसभा दणाणली

ईव्हीएम मशीन्समधील गैरव्यवहाराच्या आरोपावरून बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष आणि काँग्रेसने बुधवारी राज्यसभा दणाणून सोडली. विशेष म्हणजे पंजाब जिंकणाऱ्या आणि मणिपूर व गोव्यामध्ये सर्वाधिक मोठय़ा पक्ष बनलेल्या काँग्रेसने तर आगामी गुजरात व हिमाचल प्रदेशमधील निवडणुकांमध्ये ईव्हीएमऐवजी मतपत्रिका वापरण्याची मागणी केली.

उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मिळालेल्या विलक्षण यशाच्या पाश्र्वभूमीवर बहुजन समाज पक्षाने ईव्हीएमना लक्ष्य केले. बुधवारी बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी नियोजित कामकाज रद्दबातल करून ईव्हीएममधील गैरवापराच्या मुद्दय़ावर चर्चा करण्याची मागणी रेटली. त्यास समाजवादी पक्ष आणि काँग्रेसनेही जोरदार पाठिंबा दिला. विरोधी पक्ष उपसभापती प्रा. पी. जे. कुरियन यांच्या पुढय़ात येऊन गदारोळ घालू लागले. ‘ईव्हीएम की ये सरकार नही चलेगी, नही चलेगी’ अशा घोषणा ते देत होते. पण प्रा. कुरियन यांनी मागणी मान्य केली नाही. ईव्हीएममध्ये कोणतेही गैरप्रकार झाले नसल्याचे निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण त्यांनी वारंवार दिले, पण विरोधक ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे पाहून त्यांनी कामकाज काही काळासाठी स्थगित केले. या वेळी मायावतींनी ईव्हीएमच्या मदतीने भाजपने लोकशाहीचा खून केल्याचा आरोप केला. समाजवादी पक्षाचे प्रा. रामगोपाल यादव त्यांना पाठिंबा देत होते. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी पूर्वीप्रमाणे मतपत्रिकांवर मतदान घेण्याची मागणी लावून धरली. ईव्हीएमवरील जनतेचा विश्वास उडाल्याचे त्यांचे म्हणणे होते. याच ईव्हीएम मशीन्सद्वारे तुम्ही पंजाब जिंकले आणि मणिपूर व गोव्यात सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून विजयी झाला. तरीही तुम्ही ईव्हीएमवर संशय घेत आहात, असे भाजपकडून त्यांना टोमणे मारण्यात येत होते. पण आपला आरोप उत्तर प्रदेशातील गैरव्यवहारांवर असल्याचे प्रत्युत्तर त्यांनी दिले.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनीही मध्य प्रदेशातील भिंडमध्ये घडलेल्या प्रकाराचा उल्लेख करून भाजप सरकारविरुद्ध संशय वर्तविला. भिंडमधील मशीनवर चाचणी घेताना कोणतेही बटण दाबले तरी मत ‘कमळा’च्या पारडय़ात जात असल्याचे प्रसिद्ध झाले आहे.

या वेळी संसदीय कामकाज राज्यमंत्री मुख्तार अब्बास नक्वींनी मायावती व काँग्रेसलाच चांगलेच झोडले. पराभव स्वीकारताना शालीनता दाखविण्याचा टोमणा त्यांनी मारला. या वेळी त्यांची आणि आझादांची चांगलीच खडाजंगी झाली.

दिल्ली व बिहारमध्ये जिंकले, तेव्हा ईव्हीएम चांगले होते. आता उत्तर प्रदेशात दणदणीत पराभव झाल्यानंतर ईव्हीएम एकदम वाईट झाले आहेत..   मुख्तार अब्बास नक्वी, संसदीय कामकाज राज्यमंत्री 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2017 1:12 am

Web Title: congress party demands electronic voting machines use be stopped immediately
Next Stories
1 सत्तेसाठी भाजपकडून ५० हजार कोटींची उधळण
2 मोदी सरकारमध्ये असल्याने गप्प आहोत..
3 शंभर वेळा ‘ब्लॅक लाइव्हस मॅटर’ लिहिणाऱ्या विद्यार्थ्याची स्टॅनफोर्ड विद्यापीठासाठी निवड
Just Now!
X