भारताची लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढत असून त्यासाठी हिंदू जबाबदार नाही तर ४ बायका आणि ४० मुले या संकल्पनेला पाठिंबा देणारे लोक जबाबदार आहेत असे वक्तव्य करणाऱ्या साक्षी महाराजांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे.
एका कार्यक्रमादरम्यान साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केले होते. त्यांच्या बोलण्याचा रोख हा मुस्लीम समाजाकडे होता. या व्यतिरिक्त ते तिहेरी तलाक पद्धतीविरोधातही बोलले. या वक्तव्याप्रकरणी निवडणूक आयोगाने साक्षी महाराजांकडून बुधवारपर्यंत स्पष्टीकरण मागितले आहे.

[jwplayer cS7PgXVc]

काही लोकांमुळे देशात फूट पडत आहे असे साक्षी महाराज म्हणाले. हिंदू घटा और देश बटा असे म्हणत त्यांनी हिंदूंची लोकसंख्या घटत असल्याचे सांगितले. हिंदू असो वा मुस्लीम कोणतीही माता ही काही मशीन नाही तेव्हा तिचा विचार सर्वप्रथम व्हायला हवा असे ते म्हणाले. त्यांच्या या विधानाशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही असे वक्तव्य भाजप नेते मुख्तार अब्बास नकवी यांनी केले आहे. मी अद्याप त्यांचे वक्तव्य ऐकले नसल्याचे नकवी यांनी म्हटले.

हा देश संविधान, कायदे आणि नीतिमत्तेवर चालतो. भारतीय जनता पक्षाची भूमिका सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आहे तेव्हा साक्षी महाराजांनी केलेले हे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असू शकते त्याच्याशी भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही असे नकवी यांनी म्हटले. मी या कार्यक्रमात एक भाजप नेता या नात्याने बोलत नव्हतो असे स्पष्टीकरण साक्षी महाराजांनी दिले. मुळात हा पक्षाचा कार्यक्रमच नव्हता असे ते म्हणाले.

मी असे म्हणालो भारताची लोकसंख्या सध्या १३२ कोटी आहे. जर आपण या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर लोकसंख्या प्रमाणाबाहेर जाईल. त्यासाठी आपल्याकडे कायदा हवा. कोणत्याही धर्माची महिला असेल तिचा आदर व्हायला हवा असे ते म्हणाले. त्यामुळेच ४ बायका आणि ४० मुले असा विचार सहन केला जाणार नाही इतकेच माझे म्हणणे होते असा खुलासा साक्षी महाराजांनी केला आहे.

साक्षी महाराजांनी हे विधान केल्यानंतर त्यांच्याविरोधात सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. भारतीय दंडविधानाच्या २९८, १८८, २९५ ए, १३५ बी या कलमांनुसार त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. साक्षी महाराजांच्या वक्तव्याबाबत निवडणूक आयोगाने मेरठ प्रशासनाकडून अहवाल मागवला आहे. या प्रकरणाची सर्व अंगांनी चौकशी केली जात आहे असे जिल्हा न्यायदंडाधिकारी बी. चंद्रकला यांनी म्हटले आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे साक्षी महाराज अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करुन त्यांना निलंबित करावे असे म्हटले आहे.

[jwplayer 3TKqQGOC]