पंजाबचे माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर राज्यात मोठी संघटनात्मक जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याची चर्चा असतानाच शुक्रवारी सिद्धू यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि पंजाबचे प्रभारी हरीश रावत उपस्थित होते.

पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार असून पंजाब काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. सोनिया गांधी यांनी याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती दिली जाईल, असे रावत म्हणाले.

नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाबचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे का, असे विचारले असता रावत यांनी, तसे कोण म्हणाले, असा प्रतिसवाल केला. पंजाबबाबतचा अहवाल सोनियांना सादर करण्यासाठी आपण येथे आलो होतो, निर्णय घेतल्यानंतर त्याबाबतची माहिती दिली जाईल, असेही रावत म्हणाले. त्यापूर्वी सिद्धू सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून माध्यमांच्या प्रतिनिधींशी न बोलताच निघून गेले. सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्यास पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांचा विरोध आहे. मात्र रावत यांनी त्याचा इन्कार केला आहे. हे दोघे पक्षासाठी एकत्रित काम करतील असा तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे ते म्हणाले.

अमरिंदरसिंग यांचे सोनिया यांना पत्र

चंडीगड : पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले असून त्यामध्ये नवज्योतसिंग सिद्धू यांना प्रदेशाध्यक्ष करण्याबाबत प्रतिकूल मत व्यक्त केले असल्याचे कळते.

राज्यातील जुन्याजाणत्या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मुख्यमंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पाठविलेल्या पत्रामध्ये म्हटल्याचे पक्षातील सूत्रांनी सांगितले. दरम्यान, पंजाबचे प्रभारी हरीश रावत हे शनिवारी चंडीगड येथे अमरिंदरसिंग यांची भेट घेण्याची शक्यता आहे.