काँग्रेसचा आरोप

भाजप सरकार भारतीय नागरिकांपेक्षा अन्य देशांना पेट्रोल आणि डिझेलची विक्री स्वस्त दराने करीत असल्याचा आरोप शुक्रवारी काँग्रेसने केला. इंधनाच्या वाढत्या दरांची झळ जनतेला सोसावी लागत आहे, भाजपने जनतेशी केलेली ही प्रतारणा आहे, पुढील निवडणुकीत जनता भाजपला धडा शिकवील, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

इंधनाच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे आणि सरकारने राक्षसी कर लादून देशाला ११ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेला लुटले आहे, असा आरोप काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पेट्रोल आणि डिझेलने आतापर्यंतचा उच्चांक गाठला असून त्यामुळे सर्वसामान्य जनता, मध्यमवर्ग, शेतकरी, वाहतूकदार, छोटे आणि मध्यम उद्योगांना त्याची झळ बसली आहे, असेही ते म्हणाले.

मोदी सरकार १५ देशांना प्रतिलिटर ३४ रुपये दराने पेट्रोलची तर २९ देशांना प्रतिलिटर ३७ रुपयांनी डिझेलची विक्री करीत असल्याची बाब माहितीच्या अधिकारामध्ये उघड झाली आहे. या देशांमध्ये ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, मलेशिया आणि इस्राएल आदींचा समावेश आहे. केंद्र सरकारने अशा पद्धतीने भारतीय जनतेशी प्रतारणा करून त्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, असेही सुरजेवाला म्हणाले.