‘समान कार्यक्रमा’तून समविचारी पक्षांना एकत्र आणणार! काँग्रेसच्या महाअधिवेशनात ठराव संमत

विरोधी पक्ष एकत्र आल्यास भाजपला आव्हान देता येऊ शकते याची खात्री उत्तर प्रदेश आणि बिहारमधील लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालाने दिल्याने काँग्रेसने निवडणूकपूर्व आघाडीची संकेत दिले आहेत! समविचारी पक्षांना एकत्र आणून निवडणूकपूर्व आघाडी करण्याचा ठराव शनिवारी ८४व्या काँग्रेस महाअधिवेशनात संमत करण्यात आला. राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे महाअधिवेशन होत आहे. पूर्वी ‘यूपीए’ सत्तेवर आल्यानंतर आघाडीतील घटक पक्षांना एकत्रित बांधण्यासाठी किमान समान कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. आता २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीही अशाच रीतीने ‘समान कार्यक्रम’ आखण्यात येणार असून त्याद्वारे आघाडीची मोट बांधण्याचा इरादा ठरावाद्वारे स्पष्ट करण्यात आला.  काँग्रेसच्या महाअधिवेशनात पक्षाध्यक्ष राहुल गांधी आणि माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर हल्ला चढवला. देशाच्या घटनात्मक मूल्यांवर आघात होत असून स्वातंत्र्य ही संकल्पनाच संकटात आली आहे. घटनेचे रक्षण करण्यासाठी काँग्रेस कुठलाही त्याग करण्यास तयार आहे. देशाला फुटीर शक्तीमुळे धोका निर्माण झाला असून त्याविरोधात एकत्रितपणे लढण्याची गरज आहे, असा ठरावही करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रितपणे घेण्याचा भाजपचा प्रस्ताव अव्यवहार्य असून त्याचे विपरीत परिणाम होतील. त्यामुळे राष्ट्रीय जनमत उभारले पाहिजे, असा ठरावही महाअधिवेशनात झाला.

मतपत्रिकाच हवी!

निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी अनेक देशांनी निवडणुकीत मतपत्रिकांचा वापर सुरू केला आहे. भारतातही पूर्वीप्रमाणे मतपत्रिकांचा वापर करावा. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत साशंकता असल्याने मतपत्रिकांद्वारे मतदान घेणे आवश्यक आहे, असा ठरावही झाला.

पक्षबदलूंवर सहा वर्षांची बंदी हवी!

काँग्रेसचे काही नेते भाजपमध्ये गेले आहेत. ही गळती रोखण्यासाठी ‘पक्षबदलू नेत्यांवर किमान सहा वर्षे निवडणूक लढविण्याची बंदी घालण्यात यावी’, अशी निवडणूक आयोगाकडे मागणी करणारा ठराव संमत करण्यात आला. अशी बंदी घातली तर पैसा आणि राजकीय अस्थैर्याला आळा बसेल, असेही काँग्रेसने म्हटले आहे.