सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणाची चौकशी करणारे न्यायाधीश बी एच लोया यांच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निकालानंतर भाजपा काँग्रेस आणि खासकरुन अध्यक्ष राहुल गांधींविरोधात आक्रमक झाली आहे. पक्षाचे प्रवक्ता सतत काँग्रेसवर हल्लाबोल करत असून, देशाची माफी मागण्याची मागणी करत आहेत. इतकंच नाही तर पक्षाने हा मुद्दा देशव्यापी करण्याचा प्लान तयार केला असून, यासाठी कोणकोणत्या गोष्टी करायच्या आहेत यासंबंधी खासदारांना पत्र लिहून सूचना देण्यात आल्या आहेत. भाजपाचा हा प्लान मात्र लिक झाला आहे.

१९ एप्रिल २०१८ ला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लगेचच हे पत्र लिहिण्यात आलं होतं. यामध्ये खासदारांना तात्काळ स्थानिक प्रसारमाध्यमांसोर आपलं म्हणणं मांडण्याचा तसंच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अमित शहा यांची बदनामी केल्याबद्दल माफी मागण्याची मागणी करण्याचा आदेश देण्यात आला होता. वृत्तवाहिन्यांना बाइट देण्यासोबत प्रेस रिलीजही जारी करण्यास सांगण्यात आलं होतं. प्रेस रिलीजमध्ये काय लिहायचं आहे याचा ड्राफ्टही खासदारांना पाठवण्यात आला. पक्षाने खासदारांना पत्रकार परिषद घेण्याचा सल्लाही दिला आहे. याशिवाय निकालाचं वाचन करत वकिलाकडून समजून घेण्यासही सांगण्यात आलं आहे.

भाजपाने केंद्रीय नेत्यांनी यासंबंधी केलेले ट्विट रिट्विट करण्यासही खासदारांना सांगितलं आहे. शक्य असल्यास स्थानिक भाषेत ट्विट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसंच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप आणि एसएमएसची सुविधा वापरण्यास सांगण्यात आलं आहे. एसएमएसमध्ये काय लिहायचं आहे याचाही ड्राफ्ट पाठवण्यात आला आहे. चिठ्ठीत एसएमएस, व्हॉट्सअॅप आणि इतर मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यासाठी सात मुद्दे पाठवण्यात आले आहेत.