जम्मू- काश्मीरमधील कठुआ आणि उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील बलात्कार प्रकरणावर अखेर भाजपाने मौन सोडले आहे. लहान मुलं, महिला यांना जात- धर्म नसते. काँग्रेसकडून या प्रकरणावरुन द्वेषाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.

कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणामुळे भाजपावर चोहोबाजूंनी टीका होत आहे. कठुआ बलात्कार प्रकरणातील आरोपी हे स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित आहे. तर उन्नावमध्ये भाजपा आमदारावरच बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. या दोन्ही प्रकरणावर अखेर भाजपाने शुक्रवारी मौन सोडले. भाजपा प्रवक्त्या मीनाक्षी लेखी यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला प्रत्युत्तर देतानाच स्पष्टीकरण दिले आहे.
जम्मू- काश्मीर भाजपाने १ एप्रिल रोजीच कठुआ बलात्कार प्रकरणी प्रस्ताव मंजूर केला. मात्र, त्याची माध्यमांनी दखल घेतली नाही, असा आरोप भाजपाने केला. कठुआमध्ये पोलिसांनी तपास केला. गुन्हा दाखल होताच हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. तसेच यानंतर विशेष तपास पथकाची स्थापना देखील करण्यात आली, असे त्यांनी सांगितले. बार असोसिएशनचे अध्यक्ष सलाठीया यांना या प्रकरणात न्याय हवा असे सांगितले. तर दुसरीकडे ते हायकोर्ट बंद करण्याचा इशारा देतात. ही दुटप्पी भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. सलाठीया हे गुलाम नवी आझाद यांचे पोलिंग एजंट होते. यावरुनच किती खालच्या पातळीचे राजकारण सुरु आहे हे स्पष्ट होते, असे त्यांनी सांगितले.
लहान मुलं, महिलांना जात, धर्म नसतो. त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आपण त्यांच्यासोबत उभे राहिले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. देशात द्वेषाचे राजकारण सुरु असल्याचे त्यांनी नमूद केले.

उन्नावमधील घटना १० महिन्यांपूर्वीची होती. ११ जून २०१७ मध्ये पीडिता गायब झाली आहे. २१ जूनला ती घरी परतली. २२ जूनला पोलिसांनी तिचा जबाब घेतला. तिने अपहरण करणाऱ्या लोकांचं नाव सांगितले. मात्र, यात भाजपा आमदाराचे नाव नव्हते. यानंतर जून- जुलै महिन्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींना पीडितेने पत्र लिहीले. भाजपा आमदार कुलदीप सेंगरवर बलात्काराचे आरोप केले. पंतप्रधान कार्यालयाने तातडीने दखल घेत संबंधित विभागांनी तत्काळ कारवाई करावे, असे आदेशही दिले होते, असे लेखी यांनी म्हटले आहे.