हैदराबाद चकमकीवर काँग्रेस आमदार प्रणीत शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली असून सरकारने पोलिसांच्या पाठिशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे, आणि फाईल बंद केली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. यावेळी त्यांनी पोलिसांच्या कारवाईचं समर्थन करत हैदराबाद पोलिसांना सलाम केला. हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलीस चकमकीत ठार झाले आहेत. पोलिसांनी तपासासाठी आरोपींना घटनास्थळी नेलं असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं आहे. पोलिसांनी केलेल्या चकमकीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून काहीजण पोलिसांच्या कारवाईचं कौतुक करत आहेत तर काहीजण विरोध दर्शवत आहेत.

“हैदराबाद पोलिसांचं मी अभिनंदन करते. पीडितेच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. जेव्हा कधी पोलिसांवर अशी चकमक करण्याची वेळ येते तेव्हा सरकारने ठामपणे त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि फाईल बंद केली पाहिजे,” असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच जेव्हा कधी महिलेवर अत्याचार होईल तेव्हा पोलिसाने असं केल तर त्याला काही गैर नाही. असंही यावेळी त्यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय झालं ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींना तपासासाठी घटनास्थळी नेण्यात आलं होतं. यावेळी आरोपींनी पोलिसांवर हल्ला करत तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. चौघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्यांच्यावर गोळीबार करत ठार केलं. अशी माहिती सायबरादाबादचे पोलीस आयुक्त व्ही सी सज्जनार यांनी दिली आहे.

डीसीपी प्रकाश रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हैदराबाद पोलीस आरोपींना गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले होते. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं हे जाणून घेण्यासाठी तिथे नेण्यात आलं होतं. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी पहाटेची वेळ निवडण्यात आली होती. यावेळी आरोपींनी पोलिसांची बंदूक खेचून घेत फायरिंग केली. यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार करत आरोपींना ठार केलं”.

काय आहे प्रकरण ?
तेलंगणची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. यानंतर पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली होती. आरोपींची चौकशी केली असता अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

स्कुटी दुरुस्त करण्याच्या बहाण्याने घेऊन गेले होते
२७ नोव्हेंबरच्या संध्याकाळी चारही आरोपींनी पीडित तरुणी टोल प्लाजावर स्कुटी उभी करत असल्याचं पाहिलं होतं. यानंतर आरोपींनी सामूहिक बलात्काराचा कट रचला. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास पीडित तरुणी आपली स्कुटी घेण्यासाठी परतली असता पंक्चर झालं असल्याचं तिने पाहिलं. पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपींनीच तरुणीच्या स्कुटीमधील हवा काढली होती. पीडित तरुणी पंक्चर झाल्यामुळे चिंतेत होती. यावेळी एक आरोपी मदत करण्याचा बहाणा करत तिथे पोहोचला. त्याचा हेल्पर स्कुटी दुरुस्त करुन देतो सांगत काही दूर घेऊन गेला. यानंतर पीडित तरुणीवर जबरदस्ती करत निर्जनस्थळी नेण्यात आलं. तिथे तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.

ट्रकमधून नेला होता मृतदेह
तेलंगण पोलिसांना याप्रकरणी चार आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी सांगितल्यानुसार, बुधवारी रात्री ९.३५ ते १० दरम्यान ही सगळा प्रकार घडला होता. पोलिसांनी सांगितलं होतं की, सामूहिक बलात्कारानंतर आरोपींनी डॉक्टरचा मृतदेह ट्रकमध्ये ठेवला आणि हायवेवर काही अंतरावर जाऊन एका पेट्रोल पंपावरुन पेट्रोल आणि डिझेल खरेदी केलं. यानंतर एका निर्जनस्थळी जाऊन आरोपींनी पीडित तरुणीचा मृतदेह फेकून दिला आणि पेट्रोलच्या आधारे पेटवून दिला.