मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने आत्मविश्वास उंचावलेल्या काँग्रेसने उत्तर प्रदेशची तयारी सुरु केली आहे. समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने सोबत घेतले नाही तर काँग्रेसला एकटयाने लोकसभेची निवडणूक लढवावी लागेल. त्यादृष्टीने काँग्रेसने आतापासूनच रणनिती आखायला सुरुवात केली आहे.

सपा-बसप आघाडीमध्ये स्थान मिळाले नाही तरी पक्षाला कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज असले पाहिजे असे काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत बसपा आणि सपाने अद्यापपर्यंत मौन बाळगले आहे. विरोधी पक्षाच्या १० डिसेंबरला झालेल्या बैठकीपासूनही दोन्ही पक्ष दूर राहिले होते.

मायावती यांच्या ६३ व्या जन्मदिनाच्या निमित्ताने १५ जानेवारीला बसपची लखनऊमध्ये बैठक होईल. या बैठकीला संभाव्य घटकपक्षांना निमंत्रण दिले जाईल. या घटकपक्षांमध्ये काँग्रेस दिसत नाही. काँग्रेसही लवकरच वेगवेगळया स्तरावर बैठका घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करणार आहे. लोकसभेच्या ५४३ जागांपैकी एकटया उत्तर प्रदेशातून सर्वाधिक ८० जागा आहेत.

त्यामुळे उत्तर प्रदेश प्रत्येक राजकीय पक्षासाठी अत्यंत महत्वाचे आहे. केंद्रात सरकार बनवण्यासाठी उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त खासदार निवडणून आणण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. यूपीमध्ये सपा-बसपा आघा़डी झाली तर भाजपा समोर मोठे आव्हान निर्माण होऊ शकते. मागच्यावेळी उत्तर प्रदेशातून भाजपाचे सर्वाधिक खासदार निवडून आले होते.