नोटाबंदी हा महाघोटाळा असल्याचा आरोप करत अॅमेझॉनसारख्या परदेशी कंपन्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला, असा गंभीर आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. नोटाबंदी ही चूक झाली अशा गैरसमजुतीत राहू नका. ते अत्यंत विचारपूर्वक उचललेले पाऊल होते, ज्यामुळे अॅमेझॉनसारख्या बड्या विदेशी कंपन्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताचे दरवाजे खुले करून दिले अशी टिका राहूल मोदींनी केली आहे.

राहुल गांधी यांनी गुरुवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. रिझर्व्ह बँकेचा वार्षिक अहवाल बुधवारी प्रकाशित झाला असून यात नोटाबंदीनंतर बाद झालेल्या ९९. ३ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेकडे परत आल्याचे म्हटले आहे. त्यामुळे नोटाबंदीचा हेतू साध्य झाला आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राहुल गांधी यांनी देखील याच अहवालावरुन मोदी सरकारची कोंडी केली.

राहुल गांधी म्हणाले, चूक केल्यावर माफी मागितली जाते. मोदींनी ही (नोटाबंदी) चूक केली नव्हती. त्यांनी हे जाणून बुजून केले. सरकारने सर्वसामान्यांच्या पायावर कुऱ्हाड मारली. मोदींचे लक्ष्य हेच होते की देशातील बड्या उद्योगपतींना मदत करणे. या उद्योगपतींमुळेच टीव्हीवर दररोज मोदींचा चेहरा टीव्हीवर झळकतो. या उद्योगपतींना गरीबांच्या खिशातील पैसे देण्यात आले. हे उद्योगपती मोदींची मार्केटिंग करतात. तर मोदी जनतेचे पैसे हिसकावून या उद्योगपतींना देतात, असा आरोप त्यांनी केला.

नोटाबंदीमुळे लघु व मध्यम उद्योजक तसेच छोट्या दुकानदारांचे नुकसान झाले. हा वर्ग नोटाबंदीमुळे उद्ध्वस्त झाला. याचा फायदा शेवटी मोठ्या कंपन्यांना होणार असून अॅमेझॉनसारख्या कंपन्यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, असा आरोप त्यांनी केला.