पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार देशातले मूलभूत प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरले आहे. तसेच सगळ्याच आघड्यांवर या सरकारचे अपयश सातत्याने दिसून येते आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून त्यांचा हा पहिलाच अमेठी दौरा होता. या दौऱ्यादरम्यान त्यांनी मोदी सरकारवर टीकेचे ताशेरे झाडले. चीनमध्ये जे काम दोन दिवसात पूर्ण होते ते काम मोदींच्या राज्यात पूर्ण व्हायला एक वर्ष लागते. चीन सरकारतर्फे बेरोजगारी कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मोदी सरकार मात्र बेरोजगारीच निर्माण करते आहे. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदी जाहीर केली. ही काळ्या पैशाच्या विरोधातली लढाई आहे असे ते म्हटले होते. जर असे असेल तर काळा पैसा आहे कुठे? असाही प्रश्न त्यांनी विचारला

स्वच्छ भारत, मेक इन इंडिया या सगळ्या योजना म्हणजे जनतेच्या डोळ्यातील धूळफेक आहे. गब्बर सिंग टॅक्स अर्थात जीएसटीही या सरकारने लोकांच्या माथी मारला आहे. अरूण जेटली शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शकत नाहीत मात्र व्यापाऱ्यांना कर्जमाफी देऊ शकतात. हे सरकार जातीद्वेष, धर्मद्वेष पसरवणारे सरकार आहे. भाजपला जनतेत सौहार्द आणि बंधूभाव नको आहे. धार्मिक तेढ निर्माण करण्यातच भाजपला आणि नरेंद्र मोदींना रस आहे. जनतेच्या प्रश्नांशी या सरकारला काहीही देणेघेणे नाही अशी टीकाही राहुल गांधींनी यावेळी केली.

आमचे सरकार होते तेव्हा आमच्या कार्यकाळात आम्हाला अमेठीच्या लोकांसाठी फूड पार्क आणायचे होते. मात्र नरेंद्र मोदी सरकारने ती योजना हाणून पाडली. नरेंद्र मोदींना फक्त लांबलचक भाषणे देता येतात. गुजरातमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमधे गुजरात मॉडेलचाही फुगा फुटला आहे. प्रचारासाठी जायचो तेव्हा लोक विचारायचे गुजरात मॉडेल हे मोदी सांगत असतात कायम ते आहेतरी काय? मलाही प्रश्न पडायचा.. मात्र नंतर समजले की मोदी जे घोषणाबाजी करत फिरतात त्या जशा खोट्या असतात तसेच हे गुजरात मॉडेलही खोटेच आहे. गुजरातमध्ये ३० लाख युवक बेरोजगार आहे त्यांचा प्रश्न मोदी कधी सोडवणार? असाही प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला.